सांगली : इस्लामपूरचा संभुआप्पा उरूस 23 पासून | पुढारी

सांगली : इस्लामपूरचा संभुआप्पा उरूस 23 पासून

इस्लामपूर; पुढारी वृत्तसेवा : हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या पीर संभुआप्पा देवाचा उरूस गुरुवार, दि. 23 ते शुक्रवार दि. 1 डिसेंबर या कालावधीत भरणार आहे. यात्रेचा मुख्य दिवस सोमवार, दि. 27 नोव्हेंबर हा आहे. यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केल्याची माहिती मठाधिपती मिलिंद मठकरी यांनी दिली.

ते म्हणाले, संभुआप्पा उरूसासाठी पश्चिम महाराष्ट्र तसेच कर्नाटकातील भाविक मोठ्या प्रमाणात येतात. गुरुवारी पहिल्या दिवशी मठात मंडप चढविण्याचा कार्यक्रम होणार आहे. दि. 23 ते 27 पर्यंत रोजे उपवास होणार आहेत. शनिवार, दि. 25 ते सोमवार, दि. 27 पर्यंत फकीर होण्याचा कार्यक्रम होणार आहे. रविवारी गंधरात्र (संदल) होणार आहे. तसेच सोमवारी पौर्णिमेला यात्रेचा मुख्य दिवस आहे. घरोघरी फकीर पूजन केले जाणार आहे. याच दिवशी सकाळी शिवलिंग एकतारी भजनी मंडळाचे भजन होणार आहे. रात्री आठ वाजता शाहीर प्रसाद विभुते यांचा पोवाड्याचा कार्यक्रम आहे. मंगळवारी सकाळी 9 वाजता शासकीय व मानाचे गलेफ चढविण्यात येणार आहेत. याचदिवशी शाहीर देवानंद माळी यांचा पोवाड्याचा कार्यक्रम, बुधवारी रात्री हसन ताज कव्वाल पार्टी यांचा कार्यक्रम आहे. गुरुवारी रात्री आठ वाजता वंदना कांबळे यांचा स्वरांजली ही मराठी-हिंदी गीतांची सुरेल मैफल होणार आहे. तसेच शुक्रवारी कला विश्व नृत्यसंस्कार यांचा उत्सव मराठी संस्कृतीचा हा कार्यक्रम आहे.

यात्रेच्या पार्श्वभूमीवर मठ परिसराची स्वच्छता करण्यात आली आहे. मठाच्या रंग-रंगोटीचे काम सुरू केले आहे. पीर संभुआप्पा देवस्थान मठाचे पदाधिकारी संयोजन करीत आहेत.

Back to top button