कडेगाव; पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षण आंदोलनाला आता उग्र रूप प्राप्त झाल्याचं दिसत आहे. राज्यभरात मराठा आंदोलनकर्ते आक्रमक झाले आहेत. यामुळे काँग्रेस नेते आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी पत्राद्वारे केली आहे. याबाबत आमदार कदम यांनी याआधीही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहलं होतं.
विश्वजित कदम यांनी पत्रात लिहिलं आहे की, महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठीचे आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत चाललेले आहे. या आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे -पाटील यांनी उपोषणाच्या माध्यमातून आरक्षणाची मागणी केली आहे. लाखो तरुण स्वयंस्फुर्तीने या आंदोलनात सहभागी झाले आहेत. त्यांचा आक्रोश समजून घेणे गरजेचे असल्याचंही त्यांनी पत्रकात म्हटलं आहे.
मराठा समाजाने नेहमीच सर्व जाती-धर्मामध्ये सलोखा निर्माण करत मोठया भावाची भूमिका निभावलेली आहे. मराठा समाजातील अनेक सर्वसामान्य कुटुंबांची परिस्थिती आज खूपच बिकट आहे. ती निश्चितच सर्वांनी समजावून घेण्याची गरज आहे. आजवर लाखो मराठा कुटुंबे भूमिहीन झाली आहेत. कधी सततचा दुष्काळ तर कधी अतिवृष्टी यामुळे त्यांच्या कुटुंबाची पार वाताहत झाली. कर्जबाजारीपणामुळे त्यांचा आत्मसन्मान हरवला आहे. कुटुंबातील लोकांच्या जगण्याचे, मुलामुलींच्या शिक्षणाचे आणि लग्नाचे प्रश्न आहेतच. फक्त जात "मराठा" म्हणून त्यांची शिक्षणाची व नोकरीची संधी डावलली जाणे, हे त्यांच्यासाठी अन्यायकारक आहे. सद्यस्थितीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी व मराठा आरक्षणाबाबत तातडीने तोडगा निघावा, यासाठी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलाविणेत यावे, अशी विनंती आमदार डॉ.विश्वजित कदम यांनी पत्राद्वारे केली आहे.
हेही वाचा :