परभणी : उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली; वैद्यकीय तपासणीनंतर सलाईन सुरु | पुढारी

परभणी : उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली; वैद्यकीय तपासणीनंतर सलाईन सुरु

सेलू, पुढारी वृत्तसेवा : अंतरवाली येथील मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी शहरातील लोकमान्य टिळक पुतळा परिसरात स्थानिक मराठा तरुणांनी उपोषण सुरु केले होते. मागील ७ दिवसापासून साखळी उपोषण तर ५ दिवसापासून अन्नत्याग उपोषण सूरू आहे. दरम्यान उपोषणकर्ते प्रसाद महाराज काष्टे व जयसिंग शेळके यांची प्रकृती खालवल्यामूळे दोघांनी बुधवारी (दि.११) सकाळी वैद्यकीय तपासणी नंतर सलाईन लावण्यात आले आहे.

तसेच भाऊसाहेब झोल व एकनाथ बोरूळ यांना देखील थकवा जाणवत आहे. बुधवारी सकाळी येथील डॉ. संतोष चव्हाण, डॉ. गजानन कोंडावार, डॉ.गणेश मूळे, सचिन गायकवाड, विनोद राठोड यांच्या पथकाने अन्नत्याग अंदोलनकर्ते यांची वैद्यकिय तपासणी केली. नियमितपणे उपजिल्हा रूग्णालयामार्फत दोनवेळा वैद्यकीय तपासणी करण्यात येते. अन्नत्याग करणारे चारही उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावल्याने तहसिलदार दिनेश झांपले यांच्यासह अनेकांनी अन्नत्याग उपोषण थांबवून साखळी उपोषण करण्याची विनंती केली आहे.

मात्र, चारही अंदोलकांनी अन्नत्याग उपोषणच करण्याचा निर्धार केला आहे. सेलू शहरातील साखळी उपोषण व नियमित किर्तन सोहळ्याला समाज बांधवांचा उत्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मराठा समाजाला सरसगट कुणबी प्रमाणपत्र देवून ओबिसी कोट्यातून आरक्षण देण्यात यावे ,यासाठी ग्रामीण भागात देखील अनेक ठिकाणी साखळी उपोषण सुरू आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button