सांगलीत सराईत पाटील टोळीला मोका | पुढारी

सांगलीत सराईत पाटील टोळीला मोका

सांगली : पुढारी वृत्तसेवा

येथील सराईत गुन्हेगार करण रामा पाटील टोळीवर मोका कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. टोळीचा म्होरक्या करण रामा पाटील (वय 22, रा. शहा लुल्लानगर, एमआयडीसी, कुपवाड) याच्यासह विकी उर्फ विकास संतराम गोसावी, गेंड्या उर्फ आकाश संतोष जाधव (19), अमोल सचिन साठे (सर्व रा. वाल्मिकी आवास, सांगली) अशी त्यांची नावे आहेत. पाटील टोळी विरोधात खुनी हल्ला, दरोड्यासह गंभीर असे 23 गुन्हे दाखल आहेत.

पोलिसांनी माहिती दिली, करण पाटील हा टोळीचा म्होरक्या आहे. गेल्या काही वर्षांपासून सांगली शहर, संजयनगर, विश्रामबाग आणि कुपवाड परिसरात या टोळीने वर्चस्व वाढवण्यासाठी दहशत निर्माण केली होती. काही दिवसांपूर्वी या टोळीने एका अल्पवयीन मुलासह एका घरावर सशस्त्र दरोडा घातला होता. त्यावेळी एकावर खुनी हल्ला करण्यात आला होता.

लूटमार, दरोडा, घरफोड्या, चोरी असे 23 गंभीर गुन्हे टोळीवर दाखल आहेत. टोळीची वाढती गुन्हेगारी मोडण्यासाठी मोका कायद्याअंतर्गत प्रस्ताव देण्याचे आदेश पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिले होते. त्यानुसार शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अजय सिंदकर यांनी प्रस्ताव सादर केला होता.

तो प्रस्ताव कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक यांच्याकडे पाठवण्यात आला होता. तो तातडीने मंजूर करण्यात आला.पोलिस उपअधीक्षक अजित टिके तपास करीत आहेत. अप्पर अधीक्षक मनिषा दुबुले, एलसीबीचे निरीक्षक सर्जेराव गायकवाड, सहाय्यक फौजदार सिद्धाप्पा रूपनर, दीपक गट्टे, शहरचे अंमलदार सचिन घाटगे, गणेश कांबळे यांचा कारवाईत सहभाग होता.

पाहा  व्हिडिओ  : …आणि या गावाच नाव अपशिंगे मिलिटरी पडलं

Back to top button