S T Strike : सांगलीत एसटी कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू | पुढारी

S T Strike : सांगलीत एसटी कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

सांगली : पुढारी वृत्तसेवा

एसटी कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी गेल्या काही दिवसापासून आंदोलन सुरू आहे. त्यातच राजेंद्र पाटील या एसटी कर्मचाऱ्याचा राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. दरम्यान पाटील यांच्या मृत्यूमुळे एसटी कर्मचारी किती तणावाखाली आहेत हे दिसून येते, अशी कर्मचाऱ्यांच्यात चर्चा आहे.

गेल्या काही दिवसापासून एसटीच्या कर्मचाऱ्यांचे वेतन वाढ या सह मागण्यासाठी आंदोलन सुरू आहे. दोन दिवसापासून आंदोलन तीव्र करण्यात आले असून एसटीची वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली आहे. दुसऱ्या बाजूला शासनाने पोलिस प्रशासन आणि आरटीओ यांच्या माध्यमातून पर्यायी प्रवासी वाहतूक सुरू केलेली आहे. दुसऱ्या बाजूला एसटीचे कर्मचारी आंदोलनावर अद्याप ठाम आहेत. मागणी झाल्याशिवाय माघार घ्यायची नाही, अशी त्यांची भूमिका आहे. त्यातच आज पाटील यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ही बातमी मिळाल्यानंतर अनेक एसटी वाहतूक कर्मचाऱ्यांना धक्का बसला. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकारने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी होत आहे.

एसटी कर्मचाऱ्यांना राज ठाकरे यांनी फटकारले

आत्महत्या करणाऱ्यांचे मी नेतृत्व करणार नाही, असे सांगत एसटी कर्मचाऱ्यांना राज ठाकरे यांनी फटकारले. तसेच असे करणार नसाल तरच मी यात सहभाग घेईन, असे मनसे अध्यक्ष ठाकरे म्हणाले.

‘काम नसेल तर दाम पण नाही’ असा इशारा देत परिवहनमंत्री अध्यक्ष अनिल परब यांनी एस टी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिला आहे.

एसटी कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम असून, जोपर्यंत एसटीचे शासनात विलीनीकरण होत नाही तोपर्यंत संप मागे घेणार नसल्याच्या भूमिकेत कर्मचारी आहेत. गेली दोन आठवडे सुरू असलेला हा संप आणखी चिघळू नये, यासाठी एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, एका निवेदनाद्वारे कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घेण्याचे आवाहन केले आहे. तर दुसऱ्या बाजूला एसटी कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या एका मंडळाने आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईमधील निवासस्थानी भेट घेतली. या भेटीदरम्यान चर्चेला सुरवात करण्याआधी राज ठाकरे यांनी, कोणत्याही कर्मचाऱ्याने आत्महत्या करू नये अशी अट घातली.

 

Back to top button