‘आप’ सत्तेत आल्यास गोव्याचा मुख्यमंत्री भंडारी तर उपमुख्यमंत्री कॅथलिक समाजाचा : मनीष सिसोदिया | पुढारी

‘आप’ सत्तेत आल्यास गोव्याचा मुख्यमंत्री भंडारी तर उपमुख्यमंत्री कॅथलिक समाजाचा : मनीष सिसोदिया

पणजी : पुढारी वृत्तसेवा

आम आदमी पक्ष सत्तेत आल्यास गोव्याचा मुख्यमंत्री भंडारी समाजाचा तर उपमुख्यमंत्री कॅथलिक समाजाचा असेल अशी घोषणा दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केली. गुरुवारी पणजी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी या घोषणा केल्या . यावेळी पक्षाचे गोवा संयोजक राहुल म्हांबरे, उपाध्यक्ष महादेव नाईक, प्रतिमा कुतिन्हो व अन्य नेते उपस्थित होते.

सिसोदिया म्हणाले की गोवा राज्यात इतर मागासवर्गीय समाजाचे प्रमाण अधिक आहे. त्यातही पाहिल्यास भंडारी समाजाची संख्या जास्त आहे. गोवा मुक्तीला ६० वर्षे झाली तरी केवळ एकदाच भंडारी समाजाचा मुख्यमंत्री झाला आहे. त्यांचा कार्यकाळ देखील फक्त अडीच वर्षांचा होता.

गेली साठ वर्षे गोव्याच्या विकासात मोठा हातभार लावलेल्या भंडारी समाजाला आपल्यावर अन्याय झाल्याची भावना आहे. ही भावना दूर करण्यासाठीच आम आदमी पक्षाने हा निर्णय घेतला आहे.

भाजप असो वा काँग्रेस दोघांनीही केवळ निवडणुकीपूरता भंडारी समाजाचा वापर करून घेतला आहे. कुठल्याच पक्षाने समाजाला राजकारणात स्थान दिले नाही. त्यांनी समाजात फूट पाडण्याचेच काम केले आहे. आप मात्र सर्व समाजाला एकत्र घेऊन जाणार आहे. यासाठी आपतर्फे मिशन युनायटेड गोवा मोहीम सुरू केली जाणार असून यामध्ये कार्यकर्ते घरोघरी जाऊन सर्व समाजातील लोकांच्या भेटीगाठी घेणार आहेत. सत्तेत आल्यास कॅबिनेट मंत्रिमंडळात राज्यातील सर्व समाजाला योग्य प्रतिनिधित्व दिले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Back to top button