Tembu Water Scheme : सावळजसह ८ गावे टेंभूत समाविष्ठ करण्यासाठी सुमन पाटील, रोहित पाटील यांचे गांधी जयंतीपासून आमरण उपोषण | पुढारी

Tembu Water Scheme : सावळजसह ८ गावे टेंभूत समाविष्ठ करण्यासाठी सुमन पाटील, रोहित पाटील यांचे गांधी जयंतीपासून आमरण उपोषण

तासगाव : पुढारी वृत्तसेवा: सावळजसह परिसरातील आठ गावे ही अनेक वर्षापासून टेंभूच्या (Tembu Water Scheme) पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. टेंभू योजनेच्या अहवालास तृतीय सुधारीत प्रशासकीय मान्यता देऊन या आठ गावांचा योजनेमध्ये समावेश व्हावा, यासाठी गांधी जयंतीपासून (दि.२ ) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुलगा रोहित आर. आर. पाटील याच्या सोबतीने आमरण उपोषण करण्याचा इशारा तासगाव – कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सुमनताई पाटील यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. या उपोषणात त्यांच्या सोबत या आठ गावातील शेतकरीही सहभागी होणार आहेत. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ. एम. राजा दयानिधी यांना आज (दि.२७) देण्यात आले.

या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ अंतर्गत उर्वरित महाराष्ट्र राज्यात “टेंभू उपसा सिंचन योजना” हा प्रकल्प कार्यान्वित आहे. सदर प्रकल्पाअंतर्गत कृष्णा नदीवर कराडजवळ टेंभू या गावाजवळ बराज बांधून विविध टप्प्याद्वारे २२ टीएमसी पाणी उचलून सातारा, सोलापूर, सांगली जिल्ह्यातील एकूण सात तालुक्यामधील सुमारे ८० हजार ४७२ हेक्टर क्षेत्राला सिंचनलाभ देणे प्रस्तावित होते. पण टेंभू उपसा सिंचन प्रकल्पालगतचे उंचावरील क्षेत्र सिंचनापासून वंचित आहे. या भागाला पाणी मिळावे, यासाठी स्थानिक शेतक-यांसह लोकप्रतिनिधी गेली अनेक वर्षे सातत्याने पाठपुरावा करत आहेत. (Tembu Water Scheme)

तासगाव – कवठेमहांकाळ या कायमस्वरुपी दुष्काळाचा कलंक लागलेल्या मतदारसंघातील सावळज, सिध्देवाडी, दहिवडी, जरंडी, वायफळे, यमगरवाडी, बिरणवाडी आणि डोंगरसोनी ही आठ गावे टेंभू योजनेच्या पाण्यापासून गेली अनेक वर्षे वंचित आहेत. दिवंगत आर. आर. आबा पाटील यांनी अनेक वर्षे सातत्याने पाठपुरावा केला आहे. मी स्वत: तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उध्दव ठाकरे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, जयंत पाटील यांची पाचवेळा प्रत्यक्ष भेट घेऊन आणि निवेदन देऊन या आठ गावांचा टेंभू योजनेत समावेश करुन त्यांना हक्काचे पाणी देण्याची मागणी केलेली आहे.

आठ गावांच्या पाणी उपलब्धतेचा प्रश्न सुटला

परंतु, या आठ गावांना पाणी देण्यासाठी पाण्याची उपलब्धता होत नव्हती. पण आता पाणी उपलब्धतेचा प्रश्न सुटलेला आहे. राज्य शासनाने पत्र जा. क्र. २०२१(२१६/२०२१) दि २९/०४/२०२२ नुसार ८ टी. एम. सी. अतिरिक्त पाणी उपलब्ध करुन (एकूण ३० टी. एम. सी.) दिलेले आहे. याचा फायदा हा सातारा, सोलापूर आणि सांगली जिल्ह्यांच्या १० तालुक्यातील ३४३ गावातील एकूण १ लाख २१ हजार ४७३ हेक्टर क्षेत्राला होणार आहे. याचा लाभ माझ्या मतदारसंघातील या योजनेपासून वंचित असलेल्या सावळजसह आठ गावांना होणार आहे.
राज्य शासनाने अतिरिक्त ८ टी. एम. सी. पाणी उपलब्ध करुन दिलेनंतर आता टेंभू योजनेचा तृतीय सु. प्र. मा. अहवाल सादर केलेला आहे. त्याला मंजूरी दिलेनंतर उर्वरीत गावांचा समावेश करुन आजपर्यंत वंचित राहिलेल्या सर्व गावांना हक्काचे असे पाणी देण्यासाठी ७ हजार २१० कोटी रुपये निधी आवश्यक आहे. याबाबतचा अहवाल शासनाकडे सादर करण्यात आलेला आहे. परंतू त्याची तृतीय सु.प्र.मा. प्रलंबीत आहे.

तासगाव – कवठेमहांकाळ या मतदारसंघात सरासरीच्या ४० टक्के पेक्षा कमी पाऊस पडलेला आहे. सरासरीच्या २५ टक्केसुध्दा पेरणी होऊ शकली नाही. पेरणी झालेली खरीपाची पिके वाळून जात आहेत. येत्या कांही दिवसात चारा आणि पाण्याची भीषण टंचाई जाणवणार आहे. याबरोबर मतदारसघातील सुमारे ३३ हजार एकर क्षेत्रावरील द्राक्षबागा पाण्याअभावी अखेरच्या घटका मोजू लागल्या आहेत. या आसमानी संकटापासून भागातील जनता वाचविण्यासाठी आठ गावे टेंभू योजनेमध्ये समाविष्ठ होण्यासाठी अहवालास तृतीय सु. प्र. मा. मिळणे अत्यंत गरजेचे आहे.

Tembu Water Scheme : आदेश आल्याशिवाय माघार नाही

आमरण उपोषणामध्ये आठ गावातील शेतकरीही मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. जोपर्यंत टेंभूच्या अहवालास तृतीय सु.प्र.मा. मिळणार नाही आणि तसे आदेश शासन पारीत करणार नाही तोपर्यंत मी माझे आमरण उपोषण सुरुच ठेवणार आहे. तरी आपण आपले स्तरावरुन राज्य सरकारला याची जाणीव करुन द्या, असे या निवेदनात म्हटले आहे.

हेही वाचा 

Back to top button