सांगली: विटा येथील व्यापाऱ्यांच्या बँकेच्या सर्वसाधारण सभेत राडा | पुढारी

सांगली: विटा येथील व्यापाऱ्यांच्या बँकेच्या सर्वसाधारण सभेत राडा

विटा : पुढारी वृत्तसेवा : ग्राहक हिताच्या बाजूने कोण कोण आहात ? असा सवाल विचारल्यानंतर व्यापाऱ्यांची बँक म्हणून नावारूपाला आलेल्या येथील एका बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत रविवारी (दि. २५) मोठा राडा झाला.

याबाबत अधिक माहिती अशी की, रविवारी दुपारी येथील एका प्रथितयश बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा होती. या सभेत उपस्थित काही सभासदांनी सुरुवातीला या सभेची नोटीस विट्यातील सर्व सभासदांपर्यंत पोहोचली नाही. आणि ज्यांना पोहोचली ती ऐनवेळेस पोहोचली. त्यामुळे अनेक सभासद येऊ शकलेले नाहीत, अशी तक्रार केली. याबद्दल दिलगिरी व्यक्त करा, अशी मागणी केली. त्यावर नोटिसीचा काही विषय नाही, दिलगिरी मागणार नाही, असे उत्तर आल्याने वातावरण तणावपूर्ण झाले.

त्यावर एका सभासदाने बँकेच्या कारभाराबाबत आलेल्या तक्रारी, सूचना सर्व संचालकांपासूनच दडविल्या जात आहेत, असा आरोप केला. तसेच काही संचालक बँकेच्या बैठकीत एक बोलतात आणि बाहेर तक्रारी करतात. त्यांच्यावर दबाब आहे, हे खरे आहे काय? असा सवाल केला. त्यावर एका संचालकाने उठून काही अंशी हे बरोबर आहे, असे सांगितले. त्यानंतर एकच गोंधळ उडाला. उपस्थित अध्यक्षांच्या एका नातेवाईकाने संबंधित संचालकाच्या अंगावर धावून गेला. त्यावर अन्य एकाने थेट अध्यक्षांच्या तोंडावरच माईक फेकून मारला. त्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकामध्ये चांगलीच झटापट झाली. ढकलाढकलीही झाली.

एक सभासद अध्यक्षांच्या दिशेने चाल करून जाण्याचा प्रयत्न करत होता, त्याला अडविण्यासाठी दोघे धावले. यात एका संचालकालाही मार लागला. त्यानंतर व्यासपीठावर असलेल्या अध्यक्ष आणि संचालक मंडळाला उद्देशून तुम्ही किती जण ग्राहक हिताच्या बाजूचे आहात ते समजू द्या ? असे सांगताच ७५ टक्के संचालक व्यासपीठाच्या खाली आले. यात विशेष म्हणजे संचालक असलेला खुद्द अध्यक्षांचा मुलगाच वडिलांची साथ सोडून खाली आला. त्यामुळे आणखी गोंधळ वाढला. याच गोंधळात सभा संपल्याचे जाहीर करण्यात आले.

हेही वाचा 

Back to top button