Sangli News : डॉल्बीच्या ठोक्याने थांबला ह्रदयाचा ठोका; विसर्जन मिरवणुकीत कवठेएकंदच्या तरुणाचा मृत्यू

Sangli News : डॉल्बीच्या ठोक्याने थांबला ह्रदयाचा ठोका; विसर्जन मिरवणुकीत कवठेएकंदच्या तरुणाचा मृत्यू

तासगाव: पुढारी वृत्तसेवा : गणेश विसर्जनाची मिरवणूक बघायला गेलेल्या कवठेएकंद (ता. तासगाव) येथील शेखर सुखदेव पावशे (वय ३२) याचा डॉल्बीचा आवाज सहन न झाल्याने ह्रदयाचे ठोके बंद पडून मृत्यू झाला. ही दुर्घटना सोमवारी (दि.२५) रात्री घडली. दरम्यान, या मिरवणुकीत आवाजाची मर्यादा ओलांडून डॉल्बीचा दणदणाट सुरु असताना बंदोबस्ताला नेमलेले पोलीस नेमके काय करत होते, असा संतप्त सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे. (Sangli News)

याबाबत स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, कवठेएकंद येथे सोमवारी रात्री अनेक मंडळांच्या गणपतीचे विसर्जन होते. विसर्जन मिरवणुकीवेळी बहुसंख्य मंडळांनी डॉल्बीची व्यवस्था केली होती. सायंकाळी सात वाजता चौकाचौकात कर्णकर्कश आवाजात डॉल्बी सुरु झाले. मिरवणुकीसाठी तासगाव पोलिसांचा बंदोबस्तही तैनात होता. विविध मंडळांनी तासगाव पोलिसांच्या नाकावर टिच्चून आणि डेसिबल बाबतचा आदेश डावलून डॉल्बी चालू ठेवले. डॉल्बीसमोरच तरुणांचा धिंगाणा सुरू होता. अक्षरक्ष: कानाचे पडदे फाटायची वेळ आली तरी आवाज वाढतच होता. (Sangli News)

रात्र सरेल तसे डॉल्बी चालकांमध्ये कुणाचा आवाज मोठा याची स्पर्धा लागली. आवाजामुळे गाव हादरले होते. तरुण वर्ग तर डॉल्बीच्या समोर बेभान होऊन नाचत होता. विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी शेखर पावसे हा तरुण आला होता. त्याची आठ ते दहा दिवसांपूर्वीच अँजिओप्लास्टी झालेली होती. तरीही तो गणेश विसर्जन मिरवणुकीत आला होता.

मिरवणुका स्टॅन्ड चौकात आल्यानंतर डॉल्बीचा आवाज त्याला सहन झाला नाही. अचानक अस्वस्थ वाटू लागले. छातीत दुखू लागल्याने त्याला तासगाव येथे एका खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. परंतू, उपचारापूर्वीच डॉल्बीच्या प्रचंड आवाजामुळे हृदयविकाराचा धक्का बसून त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले. जर पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून डॉल्बीच्या आवाजावर नियंत्रण ठेवले असते, तर कदाचित हा प्रकार घडला नसता. शेखरचा जीव वाचला असता, अशी चर्चा कवठेएकंद येथे सुरू आहे.

Sangli News : गावातील दुसरी घटना…

डॉल्बीच्या प्रचंड आवाजाने बळी जाण्याची कवठेएकंद गावातील ही दुसरी घटना आहे. दहा वर्षांपूर्वीही गणेश विसर्जन सुरु असताना मिरवणुकीत डॉल्बीचा आवाज सहन न झाल्याने मनोहर जाधव यांचा मृत्यू झाला होता. शेखर पावसेच्या रुपाने आणखी एक बळी गेला आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news