शिक्षक बँकेच्या सभेत अंडीफेक; सांगलीतील प्रकार | पुढारी

शिक्षक बँकेच्या सभेत अंडीफेक; सांगलीतील प्रकार

सांगली; पुढारी वृत्तसेवा : प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या वार्षिक सभेमध्ये अज्ञातांकडून अंडीफेक करण्यात आली. यावेळी गोंधळातच सर्व विषय मंजूर करण्यात आले. यादरम्यानच विरोधकांनी सभात्याग करत समांतर सभा घेतली.

सभा सुरू झाल्यानंतर अध्यक्ष विनायक शिंदे यांनी नफा-तोटा पत्रक वाचन सुरू केले. याचवेळी विरोधकांनी घोषणाबाजी करत व फलक दाखवत त्यांच्या भाषणामध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. यावेळी सत्ताधारी गटानेही फलक दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर दिले. सत्ताधारी समर्थकांच्या हातात चांगल्या निर्णयाचे वर्णन असलेले फलक होते, तर मुख्य इमारतीसाठी सत्ताधारी गटाने केलेली तरतूद रद्द करण्याच्या मागणीबाबतचे फलक विरोधी गटाच्या हातात होते.

या गोंधळातच विरोधी गट उभा होता. त्या ठिकाणाहून व्यासपीठाच्या दिशेने दोन अंडी फेकण्यात आली. एक अंडे विनायक शिंदे यांच्यासमोर टेबलवर येऊन पडले, तर दुसरे अंडे महिला सभासदांच्या समोर पडले. या घटनेमुळे सत्ताधारी समर्थक आक्रमक झाले व विरोधकांच्या दिशेने आगेकूच करू लागले. सत्ताधारी समर्थक सभासद विरोधी गटाकडे जात असताना अविनाश गुरव यांनी त्यांना रोखले. त्यामुळे पुढील अनर्थ ठरला. तसेच विरोधक घोषणाबाजी करत सभागृहातून बाहेर पडले. बाहेर यांनी समांतर सभा घेतली. याचवेळी सभागृहामध्ये १० मिनिटांमध्ये सर्व विषय मंजूर करण्यात आले.

Back to top button