विट्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी साजरी केली काळी दिवाळी | पुढारी

विट्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी साजरी केली काळी दिवाळी

विटा : पुढारी वृत्तसेवा

खानापूर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आज (दि. ६) शेतकरी सेनेच्या माध्यमातून काळी दिवाळी साजरी करण्यात आली. आज मोठा सण असतानाही प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी येथील महसूल भवनाच्या इमारतीसमोर शेतकऱ्यांनी खर्डा-भाकरी खाऊन आंदोलन केले.

राज्यातील महसूल भवनासमोर ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या ऊस बिलाच्या मागणीसाठी काळी दिवाळी साजरी करत खर्डा-भाकरी आंदोलन केले. यावेळी शेतकरी सेनेचे भक्तराज ठिगळे, भागवत सुतार, देवा मोहिते, संदीप जाधव, संभाजी निकम, संपतराव जाधव, राजाराम जाधव यांच्यासह शेकडो ऊस उत्पादकांनी महसूल भवनासमोरच ठिय्या मांडला तसेच तहसीलदारांना निवेदनही दिले. याबाबत भक्तराज ठिगळे म्हणाले, आम्ही ६ ऑक्टोबर रोजी शेतक-याची ऊस बिले द्या या मागणीसाठी मोर्चा काढला होता. त्यावेळी १५ ऑक्टोबर रोजी शेतक-याची ऊस बिले देतो असे लेखी आश्वासन नागेवाडीच्या यशवंत शुगर कार्यकारी संचालकांनी दिले होते.

मात्र त्यावेळी पैसे दिले नाहीत त्यानंतर आम्ही २१ ऑक्टोबर रोजी मोर्चा काढला. त्यावेळी ३० ऑक्टोबर पर्यंत शेतक-याची संपूर्ण बिले त्यांच्या बँक खात्यावर वर्ग होतील असे तहसीलदार ऋषीकेत शेळके यांच्या समोर यशवंत शुगर च्या कार्यकारी संचालकांनी सांगितले होते. त्यानंतर २२, २३ ऑक्टोबरला संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर धनादेश आलेही होते. परंतु पुढच्या दोन-चार दिवसात आलेले धनादेश आपले राजकीय आणि जिल्हा बँकेतील वजन वापरून संबंधितांनी परस्पर काढून घेतले. त्यामुळे शेतकरी राजा असणाऱ्या बळीराजाला त्याच्या मुला बाळाना खायला गोड धोड अन्न, नवीन कपडे घेण्या साठी पैसे नाहीत.

दिवाळीसारखा मोठ्या सणाला काबाड कष्ट केलेल्या बळीराजाला स्वतःच्या घामाचे पैसे मिळत नसतील तर उपयोग काय? याचा अर्थ शासन या मंडळीना पाठीशी घालत आहे. काही कारखान्यांनी वर्ष-वर्ष झाले तरी ऊस बिले दिली नाहीत, काहींनी तर जिल्हा बँकेत जमा केलेले चेक राजकिय वजन वापरून ऐन दिवाळीच्या तोंडावर काढून घेत ऊस उत्पादकांची घोर फसवणूक केली आहे. ही अवस्था एक-दोन नव्हे नसून हजारो शेतकऱ्यांची आहे. या परिसरातील यशवंत शुगर (नागेवाडी), ग्रीन पॉवर (गोपुज), केन ॲग्रो (रायगाव), तासगाव सहकारी साखर कारखाना (तुरची) आणि माणगंगा (आटपाडी) या सर्व कारखान्यांनी ऊस बिले दिली नाहीत.

यशवंत शुगरने सन २०२०-२०२१ मधील पैसे दिले नाहीत. केन ॲग्रोने सन २०१८-२०१९ चे पैसे दिले नाहीत. माणगंगाने २०१६-२०१७ मधील पैसे दिले नाहीत. तासगाव आणि गोपुज या कारखानाने सन २०२०-२०२१ चे पैसे दिले नाहीत. शेतकऱ्यांना कोणी वाली राहिलेला नाही. शासनाने या कारखानाच्या अध्यक्षांवर सक्त कारवाई करावी अन्यथा आम्हा शेतकऱ्यांना टोकाचे पाऊल उचलावे लागेल, असा इशाराही यावेळी शेतकरी सेनेच्या वतीने देण्यात आला आहे. यावेळी शेतकरी सेनेच्या वतीने प्रभारी नायब तहसीलदार सत्यवान सुर्वे यांना निवेदन देण्यात आले.

तसेच शेतकरी सेनेचे भक्तराज सगळे यांनी दूरध्वनीवरून तहसीलदार ऋषिकेश शेळके यांच्याशी संपर्क साधला. असता तहसीलदारांनी गोपूज कारखान्याचे पैसे आजच जमा होतील, तसेच यशवंत साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक आर. डी. पाटील यांना आम्ही संपर्क साधला आहे. सोमवारी ते येथे येतील. त्यानंतर ऊस उत्पादक आणि ‘यशवंत’चे कार्यकारी संचालक यांच्यात बैठक होऊन संबंधित सर्व शेतकऱ्यांचे पैसे सोमवारीच कसे मिळतील याबाबत प्रशासन प्रयत्न करेल असे आश्वासन तहसीलदार यांनी दिल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

Back to top button