सांगली : अंतिम बिलापोटी ४०० रुपये दिल्याशिवाय धुराडी पेटू देणार नाही : संदीप राजोबा | पुढारी

सांगली : अंतिम बिलापोटी ४०० रुपये दिल्याशिवाय धुराडी पेटू देणार नाही : संदीप राजोबा

कडेगाव; पुढारी वृत्तसेवा : डिजिटल काटे, पूर्ण एफआरपी आणि गत हंगामातील उसाचे अंतिम बिल ४०० रुपये द्यावे अन्यथा कारखान्यांचे धुराडी पेटू देणार नाही. असा इशारा स्वाभिमानीचे नेते संदीप राजोबा यांनी पत्रकार परिषदेत दिला.

यासह स्वाभिमानीच्या या विविध मागण्यांसाठी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली दि.१३ सप्‍टेंबर  रोजी साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चा काढन्यात येणार आहे. या मोर्चात हजारोंच्या संख्येने शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आले.

यावेळी बोलताना संदीप राजोबा म्हणाले की, टेंडर भाव ३८०० रुपये प्रति क्विंटल झालेले आहेत.जवळपास ७०० रुपयेने दर वाढलेले आहेत .त्यामुळे ४०० रुपये मागील ऊसास अंतिम बिल देण्यासाठी कारखान्यांची काहीच हरकत नसली पाहिजे. पुढे ते म्हणाले, चालू वर्षी पाऊस नसल्याने उसाची दयनीय अवस्था झाली आहे. यामुळे साखरेचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे. सध्या देशात अवघे दोन ते तीन महिने पुरेल इतकीच साखर आहे. तर साखरेचे टेंडर भाव देखील वाढलेले आहे.

सध्याचे साखरेचे भाव लक्षात घेता कारखान्यांना अंतिम बिलापोटी ४०० रुपये देण्यास काहीच हरकत नाही. याचबरोबर डिजिटल काटे, पूर्ण एफआरपी आदी मागण्याबाबत १३ सप्टेंबर रोजी होणाऱ्या मोर्चात सर्व शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे त्यांनी आवाहन केले.

यावेळी जिल्हाध्यक्ष पोपटराव मोरे, राजेंद्र माने, इम्रान पटेल, बाळासाहेब जाधव, चंद्रकांत देशमुख, अजमुद्दिन लक्षण माळी, हणमंतराव होलमुखे, प्रभाकर रावळ, रमझान मुलाणी, राहुल कुंभार, सतीश घाडगे, धनाजी माळी, रमेश पवार, विष्णू माळी, अर्जुन लिंबकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button