सांगली : संभाजी भिडेंना तात्काळ अटक करा; पुरोगामी संघटनांची मागणी | पुढारी

सांगली : संभाजी भिडेंना तात्काळ अटक करा; पुरोगामी संघटनांची मागणी

इस्लामपूर : पुढारी वृत्तसेवा शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी राष्ट्रपुरूष महात्मा गांधी यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा आज (शुक्रवार) येथे पुरोगामी संघटनांनी मोर्चा काढून निषेध नोंदविला. भिडे यांच्यावर गुन्हा नोंद करुन त्यांना तात्काळ अटक करा अशी मागणी यावेळी करण्यात आली. दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ पुकारलेल्या इस्लामपूर शहर बंदला मात्र प्रतिसाद मिळाला नाही. शहरातील सर्व व्यवहार सुरळीत सुरु होते.

संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी, राष्ट्रगीत आणि तिरंगा ध्वज यांच्याबाबत अवमानकारक विधाने केली आहेत. भिडे यांच्या या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी संभाजी ब्रिगेड, विद्रोही चळवळ, शिवशंभो प्रतिष्ठान, मराठा सेवा संघ, छावा मराठा युवा महासंघ, वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस, दलित महासंघ, महात्मा फुले विचार मंच, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, भारतीय क्रांति दल यांनी बंद पुकारला होता. मात्र नागरीक व व्यापाऱ्यांनी या बंदला प्रतिसाद दिला नाही. सर्व व्यवहार सुरळीत सुरु होते.

दरम्यान संभाजी भिडे यांच्या निषेधार्थ पंचायत समिती येथून क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन निषेध मोर्चाला सुरुवात झाली. येथील तहसील कार्यालय चौकात मोर्चाचे सभेत रुपांतर झाले. त्यानंतर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी, बोलताना राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शहाजी पाटील म्हणाले, राज्यात सातत्याने राष्ट्रपुरुषांच्या अ‍वमानाचे प्रकार घडत आहेत. मात्र तरीही राज्य सरकार काहीच कारवाई करीत नाही. त्यामुळे सरकारचेच अशा लोकांना पाठबळ आहे की काय अशी धारणा जनतेची झाली आहे.
बळीराजा शेतकरी संघटनेचे बी.जी. पाटील म्हणाले, राष्ट्रध्वज व राष्ट्रपुरुषांचा अवमान करुन कित्येक दिवस झाले तरीही पोलीस संभाजी भिडे यांना अटक करु शकलेले नाहीत. पोलीस यंत्रणा सरकारच्या दबावाखाली काम करीत आहे. अँड. दिग्विजय पाटील म्हणाले, आमच्या बापजाद्यांनी रक्त सांडून हे स्वातंत्र्य मिळविले आहे. त्यामुळे आम्ही राष्ट्र ध्‍वजाचा, राष्ट्रगिताचा तसेच राष्ट्रपुरुषांचा अवमान कधीही सहन करणार नाही. अशा प्रवृत्तींना जशास तसे उत्तर देवू. काँ. धनाजी गुरव, शंकर महापुरे, उमेश कुरळपकर, उमेश शेवाळे, विजय महाडीक, संजय बनसोडे, डाँ.अमित सुर्यवंशी व कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा : 

Back to top button