सांगली : विहापूरमध्ये हाणामारीत दोन ठार - पुढारी

सांगली : विहापूरमध्ये हाणामारीत दोन ठार

कडेगाव; पुढारी वृत्तसेवा

तालुक्यातील विहापूर येथे किरकोळ कारणावरून झालेल्या हाणामारीत दोन ठार झाले आणि दोघे गंभीर जखमी झाले. संदीप भानुदास चव्हाण (वय 34) आणि विजय नानासाहेब माने (वय 35, दोघे रा. विहापूर) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. गणेश सतीश कोळी (वय 26) आणि गोरख महादेव कावरे (वय 30, दोघे रा. विहापूर) अशी जखमींची नावे आहेत. हाणामारीची ही घटना शुक्रवारी रात्री उशिरा घडली.

या खूनप्रकरणी मधुकर उत्तम मोरे (वय 28) व विशाल तानाजी चव्हाण (वय 29, दोघे रा. विहापूर) यांच्या विरोधात कडेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे.

कडेगाव पोलिस ठाण्यातून देण्यात आलेली माहिती अशी, विहापूर येथील गणेश कोळी, गोरख कावरे व विजय माने यांनी शुक्रवारी दुपारी किरकोळ कारणावरून संशयित मधुकर मोरे याचे वडील उत्तम मोरे यांना मारहाण केली होती. या तिघांनी आपल्या वडिलांना मारहाण केल्याची माहिती मोरे याला समजली.

संतापलेल्या मधुकर याने मित्र विशाल चव्हाण याच्यासह विजय माने, गणेश कोळी, गोरख कावरे यांना दांडके, काठी व उसाने मारहाण करून गंभीर जखमी केले. विजय, गणेश व गोरख या तिघांचा मित्र असलेल्या संदीप चव्हाण यालाही त्याच्या घरातून बाहेर बोलवून घेतले व त्यालाही बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले.

त्यावेळी मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने संदीप चव्हाण यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. विजय माने गंभीर जखमी झाल्याने त्यांना सांगली येथे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले; मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.

कडेगावचे पोलिस निरीक्षक पांडुरंग भोपळे व सहायक पोलिस निरीक्षक संतोष गोसावी यांच्यासह पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मुख्य संशयित मोरे याला अटक केली. दुसरा संशयित विशाल याचा पोलिस शोध घेत आहेत. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक भोपळे करीत आहेत.

हेही वाचलत का?

Back to top button