बालेवाडी : पाटीलनगरमध्ये स्लॅब कोसळला; आठ जण किरकोळ जखमी | पुढारी

बालेवाडी : पाटीलनगरमध्ये स्लॅब कोसळला; आठ जण किरकोळ जखमी

पुणे; पुढारी वृत्तसेवा

बालेवाडी, पाटील नगर येथे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी स्लॅब कोसळल्याची घटना शनिवारी रात्री उशिरा घडली. यामध्ये आठ जण किरकोळ जखमी झाले असून त्यांना नजिकच्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले, अशी माहिती पीएमआरडीएचे अग्निशमन अधिकारी सुजीत पाटील यांनी सांगितले.

घटनेची माहिती कळताच पुणे, पिंपरी चिंचवड, पीएमआरडीए अग्निशमन दलाच्या 6 फायरगाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. रात्री उशीरापर्यंत अग्निशमन दलाचे जवान स्लॅबखाली कोणी अडकले आहे का, याचा शोध घेत होते. परंतु स्लॅबखाली आणखी कोणीही अडकले नसल्याचे पाटील यांनी सांगितले.

सुजीत पाटील म्हणाले, “शनिवारी रात्री पाटीलनगरमधील बांधकाम साईटवर नवीन स्लॅब भरण्याचे काम सुरू होते. स्लॅब भरण्याचे काम सुरू असताना अचानक स्लॅब कोसळला. त्यात काही जण जखमी झाले आहे, अशी प्राथमिक माहिती मिळाली.”

बालेवाडी येथील पाटीलनगरमधील कामाच्या ठिकाणी उपस्थित असलेल्या अभियंत्याने सर्व जखमींना नजिकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. अग्निशमन दलाने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार सध्यातरी स्लॅब खाली कोणी अडकल्याचे दिसून येत नाही किंवा आवाज येत नाही तरी शोध मोहीम सुरू आहे. सात ते आठ अग्निशमन दलाच्या गाड्या त्या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत.

पहा व्हिडीओ : कळंबा कारागृहात बंदीजनांनी भरवला दिवाळी मेळा

Back to top button