सांगली : कृष्णा, वारणाकाठी पुराचा धोका | पुढारी

सांगली : कृष्णा, वारणाकाठी पुराचा धोका

सांगली; पुढारी वृत्तसेवा :  कृष्णा खोरे पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी सुरू असल्याने कोयना, धोम, चांदोली धरणांतून पाणी सोडले आहे. यामुळे कृष्णा, वारणा नदीकाठाला पुराचा धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सर्तकतेचा इशारा दिला आहे. दरम्यान, जिल्ह्यात आज दिवसभर पावसाने जोरदार बॅटिंग केली.

जिल्ह्यात गेली चार-पाच दिवस संततधार पाऊस पडत आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासांत सरासरी 9.8 मि.मी. पावसाची नोंद झाली. शिराळा तालुक्यात सर्वाधिक 37.4 मि.मी. पाऊस झाला. जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस व कंसात एक जूनपासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे : मिरज : 6.9 (124), जत : 2.9 (89.8), खानापूर-विटा : 3 (79.4), वाळवा-इस्लामपूर : 16.3 (161), तासगाव : 6.1 (138.1), शिराळा : 37.4 (413.1), आटपाडी: 1 (80.6), कवठेमहांकाळ : 3.3 (100.8), पलूस :8.5 (126.1), कडेगाव : 5.3 (101.1). धोम- बलकवडे धरणाचे तीन दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले. धरणातून 870 क्युसेक विसर्ग सुरू केला आहे. दरवाजे व विद्युतगृह मिळून एकूण 1200 क्युसेक विसर्ग सुरू आहे.

चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी होत आहे. या धरणात 25.67 टीएमसी पाणीसाठा आहे. धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पाणी पातळी नियंत्रीत ठेवण्यासाठी 905 क्युसेक विसर्ग सुरू केला आहे. याबरोबरच कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस होत असल्यामुळे धरणांमध्ये आवक वाढली आहे. त्यामुळे कोयना धरणाच्या पायथा विद्युतगृहातून 1050 क्युसेक विसर्ग सोडला आहे. त्यामुळे नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होणार आहे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

धरणांतील साठा

विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टीएमसी प्रमाणात पुढीलप्रमाणे :
कोयना : 51.78 (105.25), धोम : 7.50 (13.50), कण्हेर : 4.58 (10.10),
चांदोली : 25.67 (34.40), धोम बलकवडी : 3.47 (4.08), अलमट्टी धरणात 62.534 टीएमसी साठा झाला आहे. या धरणात आवक 114445 व जावक 6761 क्युसेक आहे.

पुलाजवळील पाणीपातळी

विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची पातळी व कंसात इशारा पातळी फुटामध्ये पुढीलप्रमाणे :
आयर्विन सांगली : 19 (40)
अंकली : 22 (45.11)
भिलवडी : 20
राजापूर बंधारा-36

 

हेही वाचा : 

Back to top button