सांगली : संततधारेमुळे जनजीवन विस्कळीत; वारणा, कृष्णेच्या पातळीत वाढ | पुढारी

सांगली : संततधारेमुळे जनजीवन विस्कळीत; वारणा, कृष्णेच्या पातळीत वाढ

सांगली;  पुढारी वृत्तसेवा : सांगली-मिरजेत रात्रभर व रविवारी दुपारपर्यंत पावसाची रिपरिप सुरूच राहिली. शिराळा तालुक्यातील चरण, वारणावतीमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली. यामुळे कोकरूड-रेठरे बंधारा, मांगले-सावर्डे पूल पाण्याखाली गेला. आटपाडी, जतमध्ये तुरळक पावसाच्या सरी झाल्या. खानापूर तालुक्यात मात्र पावसाने उघडीप दिली होती.

सांगली-मिरजेत शनिवारी सायंकाळपासून रविवारी दुपारपर्यंत पावसाच्या सरी बरसत राहिल्या. दुपारनंतर पावसाने उघडीप दिली. रिपरिप पावसामुळे रस्त्यावर पाणी साचून होते, तर काही ठिकाणी चिखल झाला. शिराळा तालुक्यात शनिवार रात्रीपासून जोरदार पावसाच्या सरी बरसत आहेत. तालुक्यातील चरण, वारणावती या परिसरात आज अतिवृष्टीची नोंद झाली. वारणा नदीचे पाणी आज पात्राबाहेर गेले. कोडरूड-रेठरे बंधारा आणि मांगले-सावर्डे पूल पाण्याखाली गेले आहे. पलूस तालुक्यात मध्यम स्वरुपाच्या सरी बरसल्या. कृष्णा नदीच्या पाण्यात वाढ झाली. कडेगाव, जत, आटपाडी तालुक्यात तुरळक पाऊस झाला. पावसामुळे सर्वत्र खरीप पेरण्यांना गती आली आहे. सोयाबीन, ऊस, मका, भूईमूग टोकणी सुरु झाली आहे. शेतकरी शेती कामात व्यस्त आहे. खानापूर तालुक्याकडे पावसाने पूर्णपणे पाठ फिरवल्याचे दिसून आले.

Back to top button