सांगली: टंचाई कामात हलगर्जीपणा खपवून घेणार नाही; खासदार पाटील यांचा इशारा | पुढारी

सांगली: टंचाई कामात हलगर्जीपणा खपवून घेणार नाही; खासदार पाटील यांचा इशारा

जत: पुढारी वृत्तसेवा: तालुक्यात दुष्काळीजन्य भयावह परिस्थिती गंभीर बनली असताना पाणी टंचाई काळातही अधिकारी वेळकाढूपणा काढत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. टंचाईकाळात जनतेच्या भावनांचा खेळ केलात, तर खपवून घेणार नाही, संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी लागेल, असा इशारा खासदार संजय पाटील यांनी दिला. ते जत येथे पंचायत समितीच्या सभागृहात टंचाई आढावा बैठकीत बोलत होते.

यावेळी आमदार विक्रमसिंह सावंत, जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे, केंद्रीय सिमेंट बोर्डाचे संचालक डॉ. रवींद्र आरळी, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सरदार पाटील, पंचायत समितीचे माजी सदस्य ॲड. दिग्विजय चव्हाण, तहसीलदार जीवन बनसोडे, गटविकास अधिकारी आप्पासाहेब सरगर, माजी सभापती बाबासाहेब कोडग आदी उपस्थित होते.

यावेळी खा. पाटील यांनी प्रशासनाने तयार केलेल्या टंचाई आराखड्याची माहिती घेतली. तालुक्यातील पाणी टंचाई असणाऱ्या गावांना टँकर सुरू करण्यास विलंब होत असल्याचे जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे यांनी लक्ष वेधले. यावर खा. संजय पाटील संतापले. तहसील कार्यालयाचा कारभार सुधारा, अन्यथा याची दखल घ्यावी लागेल. लोकांच्या अडचणी समजून घेऊन त्यावर उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच सर्व विभागाचा आढावाही त्यांनी घेतला.

खा. पाटील म्हणाले, सद्या दुष्काळी अस्मानी संकट उभे राहिले आहे. पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर समस्या निर्माण झाली आहे. याचा सामना करण्यासाठी शासन प्रशासन सज्ज आहे. सद्या जत तालुक्यात ९ टँकर सुरू आहेत. जशी मागणी येईल तसे विहिरी, बोअर आधिग्रहन बरोबरच मागेल तेथे तातडीने टँकर सुरू करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांना देण्यात आल्या आहेत.

सद्याच्या टंचाई परिस्थिती बाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी शुक्रवारी रात्री फोनवरून चर्चा झाली आहे. सद्या कोयना धरणात उपलब्ध पाणी साठा कमी असल्याने पर्याय म्हणून चांदोली धरणातून २ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत. त्याचे नियोजन रविवारपासून होणार असून बुधवारपर्यंत पाणी जतला पोहचेल. त्यामुळे तालुक्याला दिलासा मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा 

Back to top button