Raigad News : पेणमध्ये घरफोडी करणाऱ्या दोघांना सांगलीत अटक; सोन्याच्या दागिन्यांसह कार जप्त | पुढारी

Raigad News : पेणमध्ये घरफोडी करणाऱ्या दोघांना सांगलीत अटक; सोन्याच्या दागिन्यांसह कार जप्त

पेण, पुढारी वृत्तसेवा : पेण शहरातील (Raigad News)  जगदंबा सिद्धी अपार्टमेंट चिंचपाडा व रामवाडी येथील बिल्डिंगमध्ये घुसून घरफोडी केली. या प्रकरणी सांगली येथील सराईत गुन्हेगारांना अलिबाग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने फिल्मी स्टाईलने अटक केली. त्यांच्याकडून चोरी केलेले 10 तोळे सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली होंडा कार ताब्यात घेण्यात आली. या सराईतांवर राज्यात एकूण 29 गुन्हे दाखल आहेत. लोकेश राव सुतार (वय 30) आणि अरुण वसंत पाटील (वय 26, दोघे रा. लिंगनूर, ता. मिरज, जि. सांगली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

सविस्तर वृत्त असे की, 7 जुलैरोजी दुपारच्या वेळेत पेण शहरातील चिंचपाडामधील जगदंबा सिद्धी अपार्टमेंट व रामवाडी येथील साई सृष्टी अपार्टमेंट या बिल्डिंगमध्ये घुसून स्क्रुड्रायव्हरच्या साहाय्याने दरवाजाची कडी तोडून सराईतांनी घरफोडी केली. यावेळी त्यांनी 3 लाख 29 हजार रुपयांचे 10 तोळे सोने चोरले. घरफोडी केल्यानंतर महाड, महाबळेश्वर मार्गे हे दोघे सांगली येथे (Raigad News)  पळून गेले.

त्यांच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची एक टीम मिरज, सांगली येथे रवाना झाली. मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेज व बातमीदारांच्या माहिती नुसार लिंगनूर गावात दोन दिवस दबा धरून तपास केला. यावेळी चोरांनी फिल्मी स्टाईलने घरांवरून उड्या मारीत पळण्याचा प्रयत्न केला. एका खंडर मध्ये जाऊन लपले. यावेळी पोलिसांनी सापळा रचून कसोशीने त्यांच्या मुसक्या आवळल्या.
त्यांच्याकडून चोरी केलेले 3 लाख 29 हजार रुपयांचे 10 तोळे सोने व दरोड्यात वापरण्यात आलेली MH-10-DG-6774 क्रमांकाची 8 लाख किंमतीची होंडा कार असे एकूण 10 लाख 82 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. सदर दरोडेखोरांवर राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी 29 गुन्हे दाखल आहेत.

या प्रकरणाचा तपास रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशाने व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा अलिबाग पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक धनाजी साठे, पोलीस हवालदार जितेंद्र चव्हाण, विकास खैरनार, पोलीस शिपाई लालासो वाघमोडे यांनी केला.

हेही वाचा 

रायगड : सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचा पनवेल-गोवा महामार्गाचा पाहणी दौरा

रायगड : कशेडी घाटात ४ वाहनांचा विचित्र अपघात; एकाचा मृत्यू

आदिती तटकरे रायगडच्या पालकमंत्रिपदी नकोच; रायगडमधील सहा आमदारांचे विरोधाचे निशाण

Back to top button