सांगली, मिरजेत संततधार जिल्ह्यात अन्यत्र तुरळकच | पुढारी

सांगली, मिरजेत संततधार जिल्ह्यात अन्यत्र तुरळकच

सांगली; पुढारी वृत्तसेवा :  सांगली, मिरजेत बुधवारी सायंकाळी संततधार पावसाने हजेरी लावली. सुमारे पाऊण तास पावसाने हजेरी लावल्याने सांगली- मिरजतील मार्केटमध्ये पाणी साचून राहिले होते. इस्लामपूर, कवठेमहांकाळ आणि देवराष्ट्रे परिसरात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस बरसला.

गेल्या महिना ते सव्वा महिने पाठ फिरवलेल्या पावसाने आज सायंकाळी सहाच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. सांगली-मिरजेत सायंकाळी सहा ते सायंकाळी साडे सात वाजेपर्यत संततधार पाऊस बरसला. यामुळे सांगलीच्या शिवाजी मंडईमध्ये तर मिरजेतील मार्केटमध्ये पाणी साचून राहिले होते. यामुळे रस्त्यावर बसून विक्री करणार्‍या व्यापार्‍यांची तारांबळ उडाली होती. काही ठिकाणी वाहतुकीची कोंडीही निर्माण झाली होती. आजचा पाऊस हा या हंगामातील सर्वाधिक पाऊस ठरला आहे.

इस्लामपूर, कवठेमहांकाळ शहरातही सायंकाळी पावसाने हजेरी लावली. देवराष्ट्रेमध्ये जोरदार पावसाची सर झाली. यामध्ये शेतामध्ये पाणी साचून राहिले होते. आटपाडी, जत या दुष्काळी भागाबरोबरच पावसाचे आगार असणार्‍या शिराळा तालुक्याकडे मात्र पावसाने पाठ फिरवली. याठिकाणी दिवसभर ढगाळ वातावरण होते.

शिराळा पश्चिम भागात पाऊस

चरण ः शिराळा पश्चिम भागातील चरण, आरळा, मणदूर व चांदोली धरण परिसरात आज गुरुवारी दुपारी व सायंकाळी चांगला पाऊस झाला. त्यामुळे शेतकरीवर्गातून समाधान व्यक्त होत आहे. या पावसामुळे भात रोप लावणीच्या कामांना गती मिळणार आहे. गुरूवारी सकाळी पावसाची उघडझाप सुरू होती. दुपारी 1 वाजता एक तास मुसळधार पावसाच्या सरी कोसळल्या. त्यानंतर साडेपाच वाजेपर्यंत पावसाने उघडीप दिली होती. त्यानंतर पावसाची रिपरिप सुरू होती.

Back to top button