सांगली : बारा आय. टी. कंपन्या येण्यास इच्छुक : पालकमंत्री सुरेश खाडे | पुढारी

सांगली : बारा आय. टी. कंपन्या येण्यास इच्छुक : पालकमंत्री सुरेश खाडे

सांगली, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात बारा आय. टी. कंपन्या येण्यास इच्छुक आहेत. येथे आय. टी. पार्क उभारण्यासाठी आवश्यक पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन व प्रशासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही कामगार मंत्री तथा पालकमंत्री सुरेश खाडे यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी जिल्ह्यात आय. टी. पार्क उभारणीबाबत आयोजित प्राथमिक बैठकीत ते बोलत होते. राज्यात माहिती तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवांच्या सर्वंकष व्यापक विस्तारासाठी माहिती तंत्रज्ञान उद्याने, सॉफ्टवेअर उत्पादने, डेटा सेंटर तसेच नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान त्याचप्रमाणे एकात्मिक माहिती तंत्रज्ञान शहरे विकसीत करण्यावर भर देण्यात येत आहे. या संदर्भात महाराष्ट्र राज्याचे नवीन माहिती तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा धोरण 2023 लागू करण्यात आले आहे. या अनुषंगाने ही बैठक आयोजित करण्यात आली होती.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. दयानिधी, महापालिका आयुक्त सुनील पवार, जिल्हा पुरवठा अधिकारी तथा प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बारकुल, मिरज उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, महापालिका उपायुक्त स्मृती पाटील यांच्यासह आय.टी. क्षेत्रातील विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

पालकमंत्री सुरेश खाडे म्हणाले, हिंजेवाडीच्या आय. टी. हब प्रमाणे सांगली शहरातही आय. टी. पार्क उभारण्यासाठी 10 एकर शासकीय किंवा खासगी जागा उपलब्धीसाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येत आहे. जागेप्रमाणेच अखंडित वीजपुरवठा आणि इंटरनेट सुविधा, पाणी, कुशल मनुष्यबळ, कर्मचारी वाहतूक सुविधा, उपहारगृह, सुरक्षा अशा आवश्यक सर्व बाबींचा विचार करून आराखडा तयार केला जाईल.

जागा शोधण्याच्या सूचना

सांगलीत आयटी पार्कच्या उभारणीस मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे. जागा शोधण्याच्या सूचना जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या आहेत. त्याचबरोबर बजाज, टाटा उद्योग समूह यासारखे उद्योग येण्यास तयार आहेत.

टँकर पुरविण्याचे आदेश

जिल्ह्यात टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. ज्या ठिकाणी गरज आहे, त्याठिकाणी टँकर पुरवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दुबार पेरणीसाठी बियाणे पुरवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

दै. पुढारीत वृत्त

पुढारीमध्ये दि. 11 जुलैरोजी ‘जिल्ह्यात आयटी पार्कची उभारणी शक्य’ असे वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्याची दखल घेत पालकमंत्री खाडे यांनी अधिकारी आणि आयटी कंपन्यांच्या प्रतिनिधींची प्राथमिक आढावा बैठक घेतली. यामध्ये लागणार्‍या सुविधा, अडचणी आदींचा आढावा त्यांनी घेतला.

Back to top button