‘आता वेळ निर्णयाची…’ राष्ट्रवादीतल्या फुटीचे विट्यात पडसाद | पुढारी

'आता वेळ निर्णयाची...' राष्ट्रवादीतल्या फुटीचे विट्यात पडसाद

विटा; विजय लाळे : शिवसेनेत पडलेल्या उभ्या फुटीनंतर राष्ट्रवादीतही अजित पवार यांनी बंड केले. त्यांचे हे बंड सध्या राज्यात चर्चेचा विषय ठरले आहे. त्याचे पडसाद राज्याच्या राजकारणात उमटताना पाहायला मिळत असून राष्ट्रवादीतही अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट पडले आहेत. राष्ट्रवादीतल्या या फुटीचे आता विट्यात पडसाद उमटत आहेत.

माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी शरद पवार यांना कराडमध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीला अभिवादन करण्यासाठी आले असता आम्ही तुमच्या सोबत आहोत, असे दाखविण्याचा प्रयत्न केला. मात्र दुसरीकडे पाटील यांचे चिरंजीव व माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी मात्र अजित पवार यांची भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्याचे समजत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी फूटीचा मुद्दा थेट गाव-गल्ली पातळीपर्यंत पोहोचला असल्याचे स्पष्ट होत आहे.

विटा नगर पालिका इमारतीच्या बाहेर राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य कार्यकारिणी सदस्य, माजी आमदार सदाशिवराव पाटील यांच्या वाढदिवसाचे बॅनर लावले होते. काही कार्यकर्त्यांनी एका बॅनरवर त्यांच्या फोटो शेजारी शरद पवार आणि अजित पवार यांचे फोटो लावले आहेत. शिवाय या फलकावर ‘आता वेळ निर्णयाची, जे संकटात आपल्या सोबत, आपण जाऊ त्यांच्या सोबत’ असे वाक्य लिहिल्याने शहरासह संपूर्ण मतदारसंघात याची जोरदार चर्चा सुरू आहे. विट्याच्या पाटील गटांतर्गतही लोकशाहीचा मुद्दा सुरू झाला आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

हेही वाचा : 

Back to top button