भाजपने कुटुंब फोडले, किंमत चुकवावी लागेल ! : आमदार रोहित पवार | पुढारी

भाजपने कुटुंब फोडले, किंमत चुकवावी लागेल ! : आमदार रोहित पवार

कर्जत (नगर ) : पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पक्षातील काही नेते शरद पवारांचे वय वाढले व आमदार रोहित पवारांचे वय कमी आहे, अशी चर्चा करत आहेत; परंतु मी सर्वांना सांगेन, वयाची चर्चा करण्यापेक्षा विचारांची चर्चा करण्यात यावी आणि मी चांगल्या विचारांच्या सोबत आहे. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. भाजपने पवार कुटुंब फोडले आहे, त्यामुळे भविष्यात त्यांना याची किंमत मोजावी लागेल, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी केले.

आज कर्जत येथे आमदार रोहित पवारांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकार्‍यांची बैठक झाली. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर आमदार पवार प्रथमच कर्जत येथे आले होते. यामुळे त्यांना भेटण्यासाठी प्रचंड संख्येने राष्ट्रवादी व काँग्रेसचे कार्यकर्ते आले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. शरद पवार व आमदार रोहित पवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहोत, असे सांगितले.
यानंतर घटनाक्रमा संदर्भात आमदार पवारांनी संधाद साधला. यावेळी नामदेव राऊत, सूर्यकांत मोरे, बाळासाहेब साळुंखे, गुलाब तनपुरे, दीपक शिंदे, नितीन धांडे, सुनील शेलार, किरण पाटील, पोपटराव खोसे, उषा राऊत, प्रतिभा भैलूमे, ज्योती शेळके, स्वाती पाटील, प्रसाद ढोकरीकर, अ‍ॅड. सुरेश शिंदे, मोहनराव गोडसे, संतोष मेहत्रे, सतीश पाटील, देवा खरात, विशाल मेहत्रे, भास्कर भैलूमे, भाऊसाहेब तोरडमल, इक्बाल काझी, अंगद रुपनर, अरुण लाळगे, संजय लाळगे, कोठारी, उमर कुरेशी आदी उपस्थित होते.

आमदार रोहित पवार म्हणाले, भाजपचे सत्ता देशात व राज्यात कुठेही येणार नाही. यामुळे त्यांनी इतर पक्ष फोडून निवडून येण्यासाठी शिवसेने पाठोपाठ राष्ट्रवादी या दोन पक्षांमध्ये फुट पाडली. आगामी काळामध्ये त्यांना या सर्व प्रकाराची किंमत मोजावी लागणार आहे. त्यांनी काहीही केले तरी जनता ही भाजपच्या विरोधात असल्याचे चित्र आहे. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी फुटीचा सर्व घटनाक्रम कार्यकर्त्यांना सांगितला. राज्यातील कानाकोपर्‍यातील युवक व ज्येष्ठ कार्यकर्ता राष्ट्रवादी पक्षा सोबतच आहेत. पवार कुटुंबामध्ये फुट पाडण्याचे काम भाजपने केले. त्यांचे फळ त्यांना भविष्यामध्ये मिळेल.

मतदारांवर माझा संपूर्ण विश्वास : पवार
माझ्या मतदारसंघात अनेक जण येणार असे सांगत आहेत. माझी देखील त्यांना विनम्र येण्याची विनंती आहे, कारण मी चार वर्षे येथील जनतेची सेवा केली, त्यामुळे माझा येथील जनतेवर व त्यांचा माझ्यावर असलेल्या प्रेमावर पूर्ण विश्वास आहे.

हे ही वाचा :

शरद पवारांकडून नाशिकमधील उरलेल्या कार्यकर्त्यांची मोटबांधणी सुरू

पवार कुटुंबीय धमकी देण्याचे प्रकार करत नाहीत : छगन भुजबळ

 

Back to top button