द्राक्ष मालाच्या खरेदीत फसवणूक, प्रांताधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे उपोषण | पुढारी

द्राक्ष मालाच्या खरेदीत फसवणूक, प्रांताधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे उपोषण

जत; पुढारी वृत्तसेवा: खोजनवाडी (ता. जत) येथील उत्पादित सुमारे १२ लाख किमंतीची द्राक्ष मालाची खरेदी बोगस चेक, स्टॅम्प याच्याद्वारे केली होती. याबाबत शेतकऱ्यांनी जत पोलिसात तक्रार दिली होती. तपासात अधिकारी समकक्ष संबंधित व्यापाऱ्यांनी पैसे देतो अशी कबुली देऊन पैसे दिले नाहीत. तपास अधिकाऱ्यांकडून त्यांना पाठीशी घालण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे संबंधित व्यापाऱ्यांवर कारवाई करून पैसे द्यावे, या मागणीसाठी सात शेतकऱ्यांनी जत प्रांताधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.

आमरण उपोषणात लक्ष्मण महादेव हळोळी, हणमंत गणपती सुतार, महादेव बसगोंडा संती, शिवाप्पा गिरमल्ला संती, शिवाप्पा गुरूबसू कळ्ळीगुद्दी, विजय माणिक शिंदे, बळवंत जयवंत शिंदे, आदी शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे.

प्रांताधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, २०१९ मध्ये खोजानवाडी गावचे पोलीस पाटील चिदानंद कलमडी यांनी व्यापारी संजय कलमडी यांना शेतीमाल द्या. पैशाला मी जबाबदार आहे, अशी हमी देवून शेतमालाची विक्री केली. विश्वासाने सर्व शेतकऱ्यांनी माल कलमडी यांना दिला. व्यापाऱ्याने आई गंगवा लक्ष्मण कलमडी यांच्या नावाचा बोगस चेक व स्टॅम्प करून दिला. याबाबत जत पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.

पोलिस पाटील चिदानंद कलमडी आपल्या अधिकाराचा गैरवापर करत व्यापारी संजय लक्ष्मण कलमडी व आई गंगवा लक्ष्मण कलमडी यांचा कारवाईपासून बचाव करत आहेत. जत पोलिसांना शेतकऱ्यांनी वारंवार भेटून विनंती केली. शिवाय तपास अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना दाद लागू दिली नाही.

यामुळे जोपर्यंत आमचे पैसे मिळत नाहीत व पोलिस पाटील यांच्यावर कायदेशीर कारवाई होत नाही. तोपर्यंत आमरण उपोषण सुरू ठेवण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे. संबंधित व्यापाऱ्याने अनेक द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे बुडवले असल्याची चर्चा उपोषणस्थळी होत आहे.

दरम्यान पोलिसांनी फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांकडून तक्रार लिहून घेतली आहे. यात त्यांनी पुढील काही दिवसात पैसे न दिल्यास संबंधित व्यापार्‍यावर गुन्हा दाखल करू असे पोलिसांनी आश्वासन दिले. यामुळे उपोषण मागे घेत असल्याचे शेतकरी लक्ष्‍मण हळोळी, हणमंत सुतार, महादेव संती यांनी सांगितले.

हेही वाचलंत का? 

Back to top button