भारत आता चीनच्या भूमीत आक्रमण करतोय, हे केवळ पंतप्रधान मोदींमुळेच शक्य : आमदार गोपीचंद पडळकर | पुढारी

भारत आता चीनच्या भूमीत आक्रमण करतोय, हे केवळ पंतप्रधान मोदींमुळेच शक्य : आमदार गोपीचंद पडळकर

विटा; पुढारी वृत्तसेवा : आजपर्यंतच्या इतिहासात चीन आपल्या भूमीवर आक्रमण करायचा, पण आता तुम्ही पाहिले असेल चीनचे राष्ट्राध्यक्ष म्हणतात भारत आमच्या भूमीमध्ये आक्रमण करतोय, हे केवळ मोदींमुळेच शक्य झाल आहे, असे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी म्हटले आहे.

भाजपच्यावतीने संपूर्ण देशभरात महाजनसंपर्क अभियान राबविले जात आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा केंद्रातील ९ वर्षाच्या कामाची माहिती लोकांपर्यंत पोहचावी हा उद्देश आहे. या निमित्ताने विट्यात आज गुरुवारी मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष पंकज दबडे, अनिल म. बाबर, हर्षल निकम, विलास काळेबाग, पैलवान सत्यजित पाटील आदींच्या प्रमुख उपस्थितीत आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली काढण्यात आली. रॅली नंतर येथील विश्रामगृहावर झालेल्या जाहीर सभेत आमदार पडळकर यांनी पंतप्रधान मोदी यांनी जनतेसाठी गेल्या ९ वर्षात केलेल्या विविध योजनांची माहिती दिली. तसेच राज्यात वर्षभरापूर्वी आलेल्या शिंदे- फडणवीस सरकारच्या वेगवेगळ्या लोकोपयोगी निर्णयांची माहिती दिली.

यावेळी आमदार पडळकर म्हणाले, सध्या समाज माध्यमांमध्ये एक बातमी फिरत आहे की, चीनचे राष्ट्राध्यक्ष तक्रार करीत आहेत भारत आमच्या भूमीत आक्रमण करीत आहे. हे महत्त्वाचे आहे कारण आज पर्यंत पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांना चीनचा पाठिंबा असायचा आणि चीन देखील आपल्या देशावर आक्रमण करायचा. आत्ता पहिल्यांदा असं झाले आहे. चीनच्या सीमेवर आपल्या देशात पायाभूत सुविधा नव्हत्या, त्यामुळे आपले सैन्य तिथं पोहोचत नव्हते. गेल्या पाच सहा महिन्यापूर्वी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने तिथे पायाभूत सुविधा केल्या. एखाद्या हायवेवर सुद्धा आपण विमान उतरवण्याच्या सोयी- सुविधा केल्या. त्यामुळे आपले लष्कर कोणाचीही घुसखोरी तर चालू देत नाहीत पण सीमेलगत सतर्क राहिल्याने चीनचे सुद्धा वांदे झाले आहेत. पूर्वी आपण बाहेरच्या राष्ट्रांकडून शस्त्रास्त्रे विकत घेत होतो. परंतु आता आपण स्वतः निर्मिती करत आहोत. तसेच ज्याची निर्मिती होणार नाही, अशी शस्त्रास्त्रे आपण पहिल्यांदा पंचवीस टक्के विकत घेतो आणि नंतर त्याची निर्मितीचे तंत्रज्ञान विकत घेतो म्हणजे आपण सर्वार्थाने परिपूर्ण होत आहोत. केंद्र सरकारमुळेच कोरोना काळात आपल्या सर्वांचे जीव वाचलेले आहेत, असे सांगतानाच पंतप्रधान आवास योजना, रमाई आवास योजना, गरिबांना स्वस्त धान्य, ओबीसी, भटक्याविमुक्तांसाठी, लिंगायत समाजासाठी वेगवेगळ्या योजना जाहीर केल्या आहेत. त्याच्या प्रसारासाठी जनतेत जावून माहिती द्या आणि एखाद्याला मिळत नसेल तर त्याच्या अंमलबजावणीसाठी त्याला मदत करा, असे आवाहनही आमदार पडळकर यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केले.

हेही वाचा : 

Back to top button