माजी महसूलमंत्री शांताराम घोलप यांचे नाव मुरबाड रेल्वेस्थानकाला द्यावे : कपिल पाटील | पुढारी

माजी महसूलमंत्री शांताराम घोलप यांचे नाव मुरबाड रेल्वेस्थानकाला द्यावे : कपिल पाटील

मुरबाड, पुढारी वृत्‍तसेवा : महाराष्ट्राच्या स्थापनेपासून मुरबाड तालुक्याचे भाग्यविधाते अशी ओळख असलेल्या माजी महसूलमंत्री व माजी खासदार शांताराम घोलप यांचे नाव नियोजित मुरबाड रेल्वे स्थानकाला द्यावे. `शांताराम घोलप-मुरबाड रेल्वे स्थानक’ असे स्थानकाचे नामकरण करावे, अशी विनंती केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे  केली आहे.

कल्याण येथे झालेल्या जाहीर सभेवेळी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी भाषणात नियोजित मुरबाड रेल्वे स्थानकाच्या नामकरणाचा मुद्दा उपस्थित केला. तसेच शांताराम घोलप यांनी केलेल्या कार्याचे स्मरण केले.

महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर मुरबाड विधानसभा मतदारसंघात झालेल्या पहिल्या निवडणुकीपासून शांताराम घोलप यांनी मुरबाड तालुक्याचे प्रतिनिधीत्व केले. विधानसभेच्या पाच निवडणुकांबरोबरच ठाणे लोकसभेची निवडणूक एकदा जिंकली. त्यांनी स्वकर्तृत्वाने ठाणे जिल्ह्यावर ठसा उमटविला होता. राज्याच्या मंत्रिमंडळात महसूलमंत्रीपद भूषविले होते. मुरबाड तालुक्याचे भाग्यविधाते म्हणून शांताराम घोलप यांची ओळख आहे. कै. शांताराम घोलप यांची ओळख पुढील पिढ्यांना व्हावी. त्यांच्यापासून प्रेरणा मिळावी, यासाठी कल्याण-मुरबाड रेल्वेमार्गातील नियोजित मुरबाड रेल्वे स्थानकाला `शांताराम घोलप-मुरबाड रेल्वे स्थानक’ नाव द्यावे, अशी आग्रही मागणी केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुरबाड रेल्वे स्थानकाचे जनक आहेत. केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या पुढाकारामुळेच कल्याण-मुरबाड रेल्वेला मंजूरी मिळाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबरच रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका महत्वाची ठरली. राज्यात भाजपा-शिवसेनेची सत्ता आल्यानंतर, दुसऱ्याच दिवशी उपमुख्यमंत्री व अर्थ मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण-मुरबाड रेल्वेमार्गाला राज्य सरकारकडून ५० टक्के खर्चाची हमी दिली होती. त्यामुळे प्रकल्पाला वेग आला. आता नियोजित मुरबाड रेल्वेस्थानकाला `शांताराम घोलप-मुरबाड रेल्वे स्थानक’ असे नाव देण्याची मागणी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी कल्याण येथील जाहीर सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

यापूर्वी नवी मुंबई येथील विमानतळाला आदरणीय लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे, अशी आग्रही मागणी लोकसभेत कपिल पाटील यांनी २०१६ मध्ये केली होती. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने दिबांचे नाव देण्यास टाळाटाळ केली होती. मात्र, युतीची सत्ता आल्यानंतर लगेचच दि. बा. पाटील यांचे नाव विमानतळाला देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर नियोजित मुरबाड रेल्वे स्थानकाला `शांताराम घोलप-मुरबाड रेल्वे स्थानक’ असे नाव देण्याची कपिल पाटील यांची मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पूर्ण होईल, असा विश्वास मुरबाड तालुक्यातील जनतेकडून व्यक्त होत आहे.

Back to top button