Jayant Patil News : राज्यातील दंगली, दगडफेक, महिलांवर अत्याचार प्रकरणी पोलीस काय कारवाई करीत आहेत? : जयंत पाटील | पुढारी

Jayant Patil News : राज्यातील दंगली, दगडफेक, महिलांवर अत्याचार प्रकरणी पोलीस काय कारवाई करीत आहेत? : जयंत पाटील

इस्लामपूर : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रासारख्या पुरोगामी विचारांच्या राज्यात दंगली, दगडफेक, महिलांवर अत्याचार असे प्रकार वारंवार घडत असताना राज्यातील पोलीस व गुप्तहेर खाते नक्की काय कारवाई करीत आहे, असा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री आ. जयंत पाटील यांनी सरकारला केला आहे. याबाबतचे पत्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांना आ. जयंत पाटील यांनी पाठविले आहे. (Jayant Patil News)

महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था अडचणीत आणून विविध समाजामध्ये द्वेष निर्माण करुन आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रकार काही शक्ती करीत असताना त्यांच्यावर कारवाई न होणे ही बाब शासनाला निश्चितच भूषणावह नाही असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला आहे.

Jayant Patil News : फक्त ४० आमदारांच्या रक्षणासाठी हे सरकार

मुंबई चर्चगेट परिसरातील सावित्रीबाई फुले शासकीय वसतिगृहात घडलेली मुलीच्या हत्येची घटना दुर्दैवी आहे. राज्यात महिलांना सुरक्षित वाटले पाहिजे. महिलांवरील अत्याचार व त्यांचे गायब होण्याचे प्रमाण अलीकडील काळात मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. या घटनांची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करुन सामान्य जनतेचे रक्षण करण्यात हे सरकार कटिबद्ध असल्याचे दाखवून द्यावे अन्यथा फक्त ४० आमदारांच्या रक्षणासाठी हे सरकार कारभार करीत असल्याची सामान्य जनतेच्या मनातील भावनेस खतपाणी मिळेल असे आ. जयंत पाटील यांनी पत्रात म्हटले आहे.

महाराष्ट्रात सलोखा बिघडवण्याचे काम सध्या सुरू आहे.पुरोगामी महाराष्ट्रात घडत असलेल्या या प्रकारांची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ कडक कारवाई करण्याचे निर्देश संबंधितांना द्याल, अशी आशा जयंत पाटील यांनी पत्र लिहीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्यक्त केली आहे.

हेही वाचा 

Back to top button