पुणे : चालक न मिळाल्याने रिक्षातून नेला मृतदेह ; वल्लभभाई पटेल रुग्णालयातील धक्कादायक प्रकार | पुढारी

पुणे : चालक न मिळाल्याने रिक्षातून नेला मृतदेह ; वल्लभभाई पटेल रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयातील शववाहिनीला चालक नसल्यामुळे महिलेचा मृतदेह रिक्षातून न्यावा लागला. हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, या बाबीकडे कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे. देशातील सर्व कॅन्टोन्मेंट बोर्डांपैकी पहिल्या क्रमांकावर असलेल्या पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाची स्थिती नाजूक झाली आहे. अत्यावश्यक सुविधाही पुरविण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे.

शववाहिनीच्या रात्रपाळीला असलेल्या चालकाचे चार महिन्यांपूर्वी निधन झाले. मात्र, त्याच्या जागी नवीन चालकाची नेमणूक करण्यात आलेली नाही. नवा मोदीखाना परिसरातील एका 95 वर्षीय वृद्ध महिलेचे घरीच रात्रीच्या वेळी निधन झाले. त्यानंतर सकाळपर्यंत मृतदेह सरदार पटेल रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्याचा निर्णय कुटुंबीयानी घेतला. त्यानुसार रुग्णालयात चौकशी करण्यात आली. मृतदेह घेऊन या, असे सांगण्यातही आले. त्यानुसार शववाहिनीची मागणी करण्यात आली. त्या वेळी चालक नसल्याचे सांगण्यात आले. शवागारापर्यंत मृतदेह न्यायचा कसा? असा प्रश्न कुटुंबीयांपुढे निर्माण झाला. त्यानंतर रिक्षातून मृतदेह शवागारापर्यंत आणण्यात आला. परंतु, शवागारही नादुरुस्त असल्याने शेवटी मृतदेह रिक्षातूनच ससून रुग्णालयात नेण्यात आला.

मृतदेह पटेल रुग्णालयाच्या शवागारात ठेवायचा होता. परंतु, पटेल रुग्णालयात आलेला अनुभव चांगला नाही. माणसाच्या मृत्यूनंतरही त्याची अवहेलना होत आहे. या साध्या सुविधा बोर्डाला पुरवता येत नसतील, तर आम्हाला पुणे महापालिकेत जाऊ द्या. तिथे तरी किमान सुविधा मिळतील.
                                                                                                                                                                              – अक्षय चाबुकस्वार, मृत महिलेचा नातेवाईक

 

Ashadhi Wari 2023 : दुपारच्या विसाव्यासाठी तुकाराम महाराज पालखीचे नागेश्वर मंदिरात आगमन

Ashadhi Wari 2023 : संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा जेजुरीहुन वाल्हेकडे मार्गस्थ, पाहा फोटो

Back to top button