सांगली : महाराष्ट्रात आम्ही संजय पाटील यांच्यासह एकूण ४८ जागा जिंकणार : केशव प्रसाद मौर्य | पुढारी

सांगली : महाराष्ट्रात आम्ही संजय पाटील यांच्यासह एकूण ४८ जागा जिंकणार : केशव प्रसाद मौर्य

विटा : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्रात आम्ही संजय पाटील यांच्यासह एकूण ४८ जागा जिंकणार आहोत, पाटील यांना तुम्ही संबंध हिंदुस्थानात मोठ्या मताधिक्यांनी निवडून आणा असे आवाहन उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी केले. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपकडून पुन्हा एकदा खासदार संजय पाटील हेच उमेदवार असतील, असे सूचित केले. त्यामुळे पक्षातील खासदार विरोधी गट बॅकफूटवर गेल्याचे दिसत आहे.

सांगली जिल्ह्याच्या विकासाचा आढावा घेण्यासाठी आणि मोदी सरकारने केलेली कामे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य (रविवार) सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. रात्री दहा वाजण्याच्या दरम्यान ते खासदार पाटील यांच्यासह विट्याच्या छत्रपती शिवाजी चौकात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते शंकर मोहिते, किशोर डोंबे, जगन्नाथ पाटील यांच्यासह शेकडो समर्थकांनी त्यांचे जंगी स्वागत केले. चौकातील शिवछत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्याला उपमुख्यमंत्री मौर्य आणि खासदार पाटील यांनी अभिवादन केले.

प्रारंभी शंकर मोहिते यांनी उपमुख्यमंत्री मौर्य यांना आपण प्रभुरामाच्या नगरीतून आशीर्वाद घेऊन विट्याच्या नवनाथांपैकी एक असलेल्या श्री रेवणनाथांच्या भूमीत आला आहात. असाच प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद आम्हाला खासदार संजय पाटील यांच्या रूपाने लोकसभेत पाठवायचा आहे. आम्ही पाच ते सहा लाख मताधिक्यांनी खासदार पाटील यांना पुन्हा निवडून आणू, असे सांगितले. त्यावर उपमुख्यमंत्री मौर्य म्हणाले, “निश्चितच तुम्ही संजय पाटील यांना संबंध हिंदुस्थानात मोठ्या मताधिक्यांनी निवडून आणा. आता आमचा प्रयत्नच आहे की उत्तर प्रदेशातल्या ८० पैकी ८० जागा जिंकू, इकडे महाराष्ट्रातही एकूण ४८ जागा आम्ही जिकण्याचा प्रयत्न करीत आहोत, संजय पाटील यांच्यासह!” असे उद्गार काढले आहेत. त्यामुळे खासदार पाटील यांना यावेळी लोकसभेची उमेदवारी मिळणार का किंवा कसे या चर्चांना आता पूर्णविराम मिळणार आहे. तसेच भाजपमधील पक्षांतर्गत खासदार विरोधी गट ही बॅकफूटवर जाण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : 

Back to top button