Ashadhi Wari 2023 : आळंदीत वारकऱ्यांवर लाठीचार्ज झालाच नाही; पोलिस आयुक्तांचे स्पष्टीकरण | पुढारी

Ashadhi Wari 2023 : आळंदीत वारकऱ्यांवर लाठीचार्ज झालाच नाही; पोलिस आयुक्तांचे स्पष्टीकरण

आळंदी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पालखी सोहळा प्रस्थानादरम्यान पोलिसांकडून लाठीचार्ज झाल्याच्या वृत्ताचे पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी खंडन केले. तेथे केवळ किरकोळ झटापट झाल्याचे ते म्हणाले. चौबे यांनी सांगितले, की पालखी प्रस्थान सोहळा हा दरवर्षी आयोजित होतो. आजही मानाच्या 56 पालख्या आल्या होत्या.

गेल्यावर्षी चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाली होती आणि त्या वेळी काही महिलासुद्धा जखमी झाल्या होत्या. त्यामुळे या वर्षी प्रधान जिल्हा न्यायाधीश, धर्मादाय आयुक्त, मंदिर प्रमुख विश्वस्त यांच्यासोबत 3 वेळा बैठका घेऊन गेल्यावर्षीसारखी परिस्थिती निर्माण होऊ नये, म्हणून प्रत्येक मानाच्या पालखीतील प्रत्येकी 75 जणांना प्रवेश देण्याचा निर्णय पूर्वीच घेण्यात आला आणि तसे नियोजनसुद्धा करण्यात आले. मानाच्या दिंडीप्रमुखांनीसुद्धा तो मान्य केला. त्यानुसार पास वितरित करण्यात आल्या.

मुख्य म्हणजे सर्व मानाच्या दिंडी प्रत्येकी 75 जणांनाच पाठवित होते. मात्र, आज अचानक काही स्थानिक युवकांनी मधे घुसण्याचा प्रयत्न केला. मंदिर विश्वस्त आणि चोपदारसुद्धा त्यांना समजावण्यासाठी आले. पण ते युवक ऐकत नव्हते. बॅरिकेड तोडून त्यांनी आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्या स्थानिकांशी केवळ किरकोळ झटापट झाली, पोलिसांनी लाठीचार्ज किंवा बळाचा वापर केलेला नाही. त्यामुळे लाठीचार्ज केला, हे म्हणणे खोटे आहे.

सर्व वारकरी हे प्रशासनाला

उत्तम सहकार्य करीत आहेत. त्यामुळे महाराष्ट्राची उच्च परंपरा असलेल्या वारीला उगाच गालबोट लावण्याचा प्रयत्न कुणी करू नये, ही माझी नम्र विनंती असल्याचे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी सांगितले.

हेही वाचा

Ashadhi wari 2023 : अवघे पुणे शहर होणार भक्तीमय

कोल्हापूर : उद्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ‘शासन आपल्या दारी’

मोठी बातमी : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना धमकी देणाऱ्याला पुण्यातून अटक

Back to top button