नवी दिल्ली; वृत्तसंस्था : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या बिपरजॉय चक्रीवादळाचे अतितीव्र वादळात रूपांतर झाले असून हे वादळ १५ तारखेच्या आसपास कच्छ आणि कराचीच्या सीमेवर धडकणार आहे. यादरम्यान १२५ ते १३५ किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. आयएमडीने रविवारी सौराष्ट्र आणि कच्छला यलो अलर्ट जारी केला आहे. यामुळे गुजरातचे समुद्रकिनारे पर्यटकांसाठी बंद करण्यात आले असून एनडीआरएफच्या पथकांना सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
भारतात येणाऱ्या मान्सूनच्या प्रवासात खोडा घालणारे विपरजॉय चक्रीवादळ अरबी समुद्रात पुढे सरकले असून ते १५ जूनच्या आसपास भारताच्या कच्छ आणि पाकिस्तानच्या सिंध प्रांताच्या सीमेवर धडकणार आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आता सुसाट सुटलेल्या या चक्रीवादळाचे अतितीव्र वादळात रूपांतर झाले आहे. या वादळाची तीव्रता अधिक असल्याने समुद्र चांगलाच खवळला आहे.
गुजरातने खबरदारीचा उपाय म्हणून सारे समुद्रकिनारे पर्यटकांसाठी बंद केले असून या वादळाचा फटका बसण्याची शक्यता ध्यानात घेऊन गुजरात प्रशासन हाय अलर्टवर आहे. एनडीआरएफची पथके सज्ज ठेवण्यात आली असून वादळाची तीव्रता ध्यानात घेऊन येत्या २४ ते ३६ तासांत धोकादायक किनाऱ्यावरील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार सध्या हे वादळ भारत आणि पाकिस्तानच्या सीमेकडे सरकत आहे.
इस्लामाबाद: पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वा आणि पंजाबच्या अनेक भागात मुसळधार पाऊस व वादळामुळे ४५ जणांचा मृत्यू झाला, तर १४० लोक जखमी झाले आहेत. अनेक घरे कोसळली. तसेच ठिकठिकाणी विजेचे खांब, झाडे उन्मळून पडली. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी बचावकार्याला वेग देण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. खैबर पख्तुनख्वाँमधील बन्नू, लक्की मारवात, डेरा इस्माईल खान आणि करक जिल्ह्यांत मिळून २५ जण मरण पावले आहेत. पंजाबातील खुसाव जिल्ह्यातील एका गावात घराची भिंत कोसळल्याने तीन मुली मरण पावल्या आहेत.
हेही वाचा :