महाराष्ट्र सदनातून सावित्रीबाईं फुले आणि अहिल्याबाई होळकरांचा पुतळा हटवणे चिंतेची बाब : जयंत पाटील | पुढारी

महाराष्ट्र सदनातून सावित्रीबाईं फुले आणि अहिल्याबाई होळकरांचा पुतळा हटवणे चिंतेची बाब : जयंत पाटील

इस्लामपूर; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र सदनात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री समोर बसलेले असताना सावित्रीबाई फुले आणि अहिल्यादेवी होळकर या कर्तृत्ववान महिलांचे पुतळे हटवले जातात ही चिंतेची बाब आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महाराष्ट्र सदनातील प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. आज माध्यमांशी ते बोलत होते.

यावेळी आमदार जयंत पाटील म्हणाले, कर्तुत्ववान महिलांचे पुतळे ठेवायचेच नाही ही भूमिका ठेवून हा कार्यक्रम झाला. त्यामुळे या महिलांबाबत सरकारच्या मनात काय भूमिका आहे, हे महाराष्ट्राला कळले आहे. महाराष्ट्र सदनामध्ये झालेल्या कार्यक्रमात महाराष्ट्रातील दोन कर्तबगार भगिनी सावित्रीबाई फुले आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा पुतळा बाजूला करण्यात आला व तेथे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पुतळा ठेवून जंयतीचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. तो कार्यक्रम करायला कोणाचाही विरोध नाही परंतु त्याठिकाणी सावित्रीबाई फुले आणि अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा दिसता कामा नये एवढा द्वेष का? असा संतप्त सवालही पाटील यांनी केला आहे.

या दोन कर्तबगार महिलांनी देशासमोर आदर्श ठेवला आहे. आज महिला शिकल्या याचे सर्व श्रेय सावित्रीबाई फुले यांना जाते तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी देशभर पुण्यकर्म केले आहे. त्यांचा पुतळा बाजूला ठेवणे याचा निषेध महाराष्ट्रातील जनता करेलच शिवाय देशातील जनताही करेल, असेही जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

हेही वाचा : 

Back to top button