सांगली : महावितरणची परवानगी न घेता ट्रान्सफॉर्मरची उभारणी: ठेकेदारावर गुन्हा दाखल | पुढारी

सांगली : महावितरणची परवानगी न घेता ट्रान्सफॉर्मरची उभारणी: ठेकेदारावर गुन्हा दाखल

जत; पुढारी वृत्तसेवा : उटगी (ता. जत) येथे महावितरणची विनापरवागी न घेता परस्पर २ ट्रान्सफॉर्मरची उभारणी केल्याने एका ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय बाबर असे गुन्हा दाखल झालेल्या ठेकेदाराचे नाव आहे. सदरचा प्रकार एका निनावी अर्जामुळे उघडकीस आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत महावितरणचे उमदी कार्यालयाचे सहाय्यक अभियंता लक्ष्मणकुमार गुरव यांनी जत पोलिसात फिर्याद दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, ट्रान्सफॉर्मर बसवण्यासाठी महावितरणची मंजुरी घेण्याची आवश्यकता असतानाही अनुप इलेक्ट्रिकलचे ठेकेदार संजय बाबर यांचा महावितरण कार्यालयास निनावी अर्ज प्राप्त झाला होता. या अनुषंगाने सहाय्यक अभियंता लक्ष्मण कुमार गुरव यांनी शनिवारी २७ जून रोजी स्थळपाहणी केली. यावेळी मंजुरी न घेता परस्पर काम पूर्ण केल्याचे उघडकीस आले आहे.  63 केव्ही मंजुरी असताना 100 केव्ही चा ट्रान्सफॉर्मर बसवला आहे. असाही प्रकार आढळून आला आहे.

या ट्रान्सफॉर्मरवर नाव व कोणताही अनुक्रमांक नसल्याचे दिसून आले. तसेच दोन्हीही ट्रान्सफॉर्मर निळ्या रंगाचे आहेत. याबाबत व्हिडिओ व चित्रीकरण गुरव यांनी केले. यामुळे विद्युत अधिनियम कायद्याचे उल्लंघन केल्याने अनुप इलेक्ट्रिकल यांच्यावर विद्युत अधिनियम कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास जत पोलीस करत आहेत.

महिन्यातील दुसरा गुन्हा

उमदी येथे विद्युत कायद्याचे उल्लंघन करत कोणत्याही प्रकारची महावितरणची परवानगी अथवा मंजुरी न घेता शेतकऱ्याच्या मागणीनुसार मंगळवेढा येथील संतोष पवार यांनी ट्रांसफार्मर उभा करत विद्युत पुरवठा सुरू करून दिला होता त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर हा जत तालुक्यातील विना परवाना ट्रान्सफॉर्मर उभा करण्याचा या महिन्यातील दुसरा गुन्हा आहे.

हेही वाचा; 

Back to top button