BJP CM and PM Modi : भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधानांची बैठक

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवार भाजप मुख्यालयात भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्र्यांची बैठक घेतली. बैठकीतून मुख्यमंत्र्यांनी राज्यात सुरू असलेल्या विकास कार्याची माहिती पंतप्रधानांना दिल्याचे कळते.पंतप्रधानांनी आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी संदर्भात सर्व मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केल्याची माहिती देखील समोर आली आहे. (BJP CM and PM Modi)
बैठकीत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र भाई पटेल, नागालॅन्डचे उपमुख्यमंत्री यानथुंगो पॅटन, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान तसेच त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा उपस्थित होते.
बैठकीला संबोधित करतांना पंतप्रधान म्हणाले, अमृत काळ देशाला एक नवीन दिशा देणारा आहे. संसदेची नवीन वास्तू देशाची दृष्टि तसेच नवीन भारताच्या संकल्पनेचे एक मुर्तीमंत उदाहरण ठरेल.वास्तूच्या बांधकामात ६० हजारांहून अधिक मजूरांना रोजगार मिळाला.त्यांच्या मेहनतीला सन्मानित करण्यासाठी नवीन संसद भवनात एक डिजिटल गॅलरी बनवण्यात आल्याचे मोदी म्हणाले.