विटा : मुख्याधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचारात सामिल असणाऱ्यांची चौकशी करा; सत्ताधारी नगरसेवकांची मागणी | पुढारी

विटा : मुख्याधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचारात सामिल असणाऱ्यांची चौकशी करा; सत्ताधारी नगरसेवकांची मागणी

विटा; पुढारी वृत्तसेवा : विटा पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचारात कोण कोण सामिल आहेत, याची सखोल चौकशी करा अशी मागणी मावळत्या कौन्सिल मधील सत्ताधारी गटाच्या सर्व नगर सेवकांनी केली आहे.

विटा नगरपालिकेचे लाचखोर मुख्याधिकारी विनायक औंधकर यांना अँटी करप्शन अंतर्गत कारवाई झाली असून २० मे पर्यंत त्यांना पोलीस कोठडीची हवा खावी लागत आहे. यावर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. आज, शुक्रवारी सत्ताधारी गटाच्या मावळत्या सदस्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. यात प्रशासक असले तरी पुन्हा एकदा सक्रिय होत पालिकेच्या कामकाजावर लक्ष देण्याचा निर्णय एकमुखाने घेण्यात आला. तसेच नवीन मुख्याधिकाऱ्यांची नेमणूक होईपर्यंत प्रभारी मुख्याधिकारी तातडीने नेमावा, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. तसेच लाचखोर मुख्याधिकारी विनायक औंधकर यांचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला.

यावेळी माजी उपनगराध्यक्ष किरण तारळेकर, माजी नगरसेवक सचिन शितोळे, सुखदेव पाटील, उपनगराध्यक्ष सुभाष भिंगारदेवे, माजी नगरसेवक प्रशांत कांबळे, नगरसेवक अँड. विजय जाधव आदी प्रमुख उपस्थित होते.

निवडणुकांअभावी विटा पालिकेमध्ये गेल्या दीड वर्षांपासून प्रशासक आहेत. लाच खोर मुख्याधिकारी औंधकर यांच्या गेल्या तीन महिन्याच्या कारभाराबाबत कसून चौकशी झालीच पाहिजे. प्रशासक म्हणून प्रांताधिकारी काम करीत असताना त्यांचा मुख्याधिकाऱ्यांच्या कारभारावर वचक का नव्हता? मुख्याधिकाऱ्यांच्या भ्रष्ट कारभारामध्ये कोण कोण सामील आहेत? याचीही सखोल चौकशी करा, अशी मागणी करण्यात आली.

माजी उपनगराध्यक्ष किरण तारळेकर म्हणाले, बांधकाम परवान्यासाठी दोन लाखांची लाच स्विकारताना मुख्याधिकारी रंगेहाथ सापडल्याने देशात स्वच्छतेबाबत नावलौकिक निर्माण केलेल्या विटा पालिकेच्या कारभाराला मुख्याधिकारी औंधकर यांनी काळिमा फासला आहे. आजवर अनेक मुख्याधिकारी होऊन गेले परंतु केवळ तीन महिन्यांची विनायक औंधकर यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली. ओबीसी आरक्षणाच्या न्यायालयीन प्रक्रियेमुळे पालिका निवडणुका लांबणीवर गेल्या आहेत. विटा पालिकेवर प्रशासक राजवट असल्यामुळे आणि आमच्या मावळत्या कौन्सिलची मुदत संपल्यामुळे आमचे दुर्लक्ष झाले. इथून पुढे असे होऊ देणार नाही.

सुखदेव पाटील म्हणाले, मुख्याधिकाऱ्यांनी पालिकेच्या चांगल्या परंपरेला गालबोट लावले. विट्यातील वातावरण दूषित केले आहे. त्यामुळे विटा पालिकेचा कारभार सुधारण्यासाठी मावळत्या कौन्सिलला राज्य शासनाने मुदतवाढ द्यावी. सचिन शितोळे म्हणाले, गेल्या तीन महिन्यांच्या कारकिर्दीत औंधकर यांनी अनेक चुकीचे निर्णय घेतले. अनुकंपा तत्वावर भरती झालेल्या लोकांना नोकरीवरून कमी केले त्यांच्याकडे पैशांची मागणी केली, तीन महिन्यात एकाही कर्मचाऱ्याला रजा दिली नाही, २७ कंत्राटी कर्मचाऱ्यांना नोकरीवर काढून टाकले, खातेप्रमुखांचे अधिकार काढून स्वतः कडे घेतले, थकीत मालमत्ता करधारकांचे शहरात ५४ ठिकाणी डिजीटल बोर्ड लावून नागरिकांना नाहक त्रास दिला. यासह मनमानी कारभार करून विटा पालिकेची बदनामी केली.

सुभाष भिंगारदेवे म्हणाले, गेल्या तीन महिन्यात प्रशासक असणाऱ्या प्रांताधिकाऱ्यांचा मुख्याधिकारी विनायक औंधकर यांच्यावर कोणताही वचक नव्हता. मुख्याधिकारी औंधकर हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात रंगेहाथ सापडेपर्यंत प्रशासक काय करत होते ? त्यांचे लक्ष कुठे होते ? तसेच मुख्याधिकारी औंधकर यांना कोणी कोणत्या उद्देशाने विटा पालिकेत आणले होते, हे लक्षात येते. त्या लोकांचे त्यांना पाठबळ होते. परंतु, भैरवनाथाच्या कृपेने अशा भ्रष्टाचारी अधिका ऱ्याला शिक्षा मिळाली आहे. यावेळी प्रशांत कांबळे, अँड. विजय जाधव, अविनाश चोथे यांनीही मनोगत व्यक्त केले.

यावेळी फिरोज तांबोळी, भरत कांबळे, अविनाश चोथे, अरुण गायकवाड, विशाल तारळेकर, संजय तारळेकर, तानाजी जाधव, विकास जाधव, माधव रोकडे उपस्थित होते.

अधिक वाचा :

Back to top button