उत्तराखंडमध्ये ढगफुटी; जलप्रलयामुळे उडाला हाहाकार | पुढारी

उत्तराखंडमध्ये ढगफुटी; जलप्रलयामुळे उडाला हाहाकार

पुढारी ऑनलाईन डेस्क

उत्तराखंडमध्ये पुन्हा एकदा ढगफुटी झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात जलप्रलय आला असून देवभूमीत हाहाकार उडाला आहे. रविवारी सुरू झालेला पाऊस अजूनही सूरू असून अनेक ठिकाणी प्रचंड नुकसान झाले आहे. जलप्रलयामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक ठिकाणी भुस्खन झाले आहे. जलप्रलयामुळे चारधाम यात्रा रद्द केल्याचे उत्तराखंड सरकारने जाहीर केले आहे.

बद्रीकेदार, यमुनोत्री आणि धारचूला-मुनस्यारी या उंच भागात बर्फवृष्टी सुरू असून बचावकार्यात प्रचंड अडथळे निर्माण होत आहेत. जलप्रलयामुळे उत्तराखंडमध्ये हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच बचावकार्यासाठी एनडीआरएफची ३० सदस्यांची टीम तैनात केली आहे.

केदारनाथच्या उंच पहाडी भागात बर्फवृष्टी झाली असून रविवार (दि. १७) दुपारपासून बद्रीकेदारनाथ धाम येथे अचानक हवामानात बदल झाला. तेथे पावसाने अचानक जोर धरला. या पसिरात पावसाचा जोर काहींसा ओसरला असला तरी कडाक्याची थंडी आहे. गोपेश्वर, चमोली, पीपलकोटी भागात अद्याप पाऊस सुरू आहे.

उत्तराखंडमध्ये ढगफुटी : प्रवाशांची सुटका

राज्यात अनेक ठिकाणी प्रवाशी अडकले असून एसडीआरएफ, उत्तराखंड पोलीसांनी जानकी चट्टी येथून काही प्रवाशांची सुटका केली. त्यांना सुरक्षितरित्या गौरीकुंड येथे पोहचवले आहे. केदारनाथाच्या दर्शनानंतर ते अडकून पडले होते. भूस्खलन आणि जमीन खचण्याचा धोका निर्माण झाला होता. गौरीकुंड – केदारनाथ पायी मार्गावर मंदाकिनी नदीच्या दुसऱ्या बाजुला अडकून पडलेल्या जखमी प्रवाशांना बाहेर काढले. बद्रीनाथ महामार्गावर भूस्खलन झाले असून तेथे अनेक वाहने अडकून पडली आहेत. जेसीबीच्या सहाय्याने त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

शाळा, कॉलेज बंद

जलप्रलयाचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले असून खबरदारीचा उपाय म्हणून शाळा, कॉलेज बंद ठेवली आहेत. राज्यात आलेल्या पर्यकांसाठी सूचना जारी केल्या असून नारिकांनी अनावश्यक प्रवास टाळून घरीच रहावे असे निर्देश दिले आहेत.

भूस्खलनामुळे दोन मुलांचा मृत्यू

अल्मोडामधील भिकीयासैन येथे एका घरावर भूस्खलन झाल्याने मातीच्या ढिगाऱ्याखाली दोन मुलांचा मृत्यू झाला. त्या दोन्ही मुलांचे मृतदेह बाहेर काढले आहेत. अल्मोडा येथे एसडीआरएफ आणि पोलिसांनी अन्य दोन व्यक्तींना सुरक्षित बाहेर काढले.

हेही वाचा : 

Back to top button