Miraj Accident | पंढरपूरला जाताना सरवडे येथील ६ जणांवर काळाचा घाला, देवदर्शनाची पोवार कुटुंबियांची इच्छा राहिली अपुरी | पुढारी

Miraj Accident | पंढरपूरला जाताना सरवडे येथील ६ जणांवर काळाचा घाला, देवदर्शनाची पोवार कुटुंबियांची इच्छा राहिली अपुरी

सरवडे (ता. राधानगरी) : पुढारी वृत्तसेवा; सरवडे (ता. राधानगरी, जि. कोल्हापूर) येथील जयवंत पोवार त्यांच्या कुटुंबियांसमवेत पंढरपूरला देवदर्शनासाठी जात होते. मात्र, राजीव गांधीनगर येथे रत्नागिरी- नागपूर राष्ट्रीय महामार्गावर भरधाव बोलेरो चारचाकी आणि विटाने भरतेता ट्रॅक्टर यांचा भीषण अपघात होऊन ६ जण ठार झाल्याची घटना आज सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. एकाच बोलेरोमध्ये सात जण असल्याची माहिती मिळत आहे. मृतांमध्ये एक महिला, बालकाचा समावेश आहे. यात चालक उमेश शर्मा (वय ३५, रा.शेळेवाडी, मूळ गाव बिहार)  सोहम पवार ( वय १२), जयवंत पोवार (वय ४५) , कोमल शिंदे (वय ६०), लखन शिंदे (वय ६०) (सर्व रा. सरवडे, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर ) यांचा समावेश आहे. (Miraj Accident)

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी- नागपूर या रस्त्याचा बायपास रस्ता दोन दिवसांपूर्वी सुरु झाला असून सदर या बायपास रस्त्यावर राजीव गांधी नगर या ठिकाणी विटांनी भरलेली ट्रॉली विरोधी दिशेने आल्याने बोलेरो (MH o9 DA 4912) गाडीने त्याला जोरदार धडक दिली. या धडकेत बोलेरो गाडीतील तीन पुरुष एक महिला व एका बारा वर्षाच्या मुलाच्या जागीच मृत्यू झाला आहे. तर चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.  मृत पाच जण हे सरवडे येथील (ता. राधानगरी) आहेत. तर या अपघातात तीन जण जखमी झाले असून एका जखमी महिलेची स्थिती गंभीर आहे.

याबाबतची नातेवाईकांना माहिती मिळताच ते तात्काळ मिरजेला रवाना झाले आहेत. जखमी तिघांवर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातस्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक बसवराज तेली, पोलीस उपाधीक्षक अजित टीके, ग्रामीणचे पोलीस निरीक्षक देशमुख, महात्मा गांधी चौकीचे भालेराव यांच्यासह पोलिस अधिकारी व कर्मचारी दाखल झाले आहेत. सरवडे येथील सर्व व्यवहार बंद करण्यात आले असून संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. (Miraj Accident)

हे ही वाचा :

Back to top button