नगर: उंबरे येथे सुटीवर आलेल्या जवानाचा अपघातात मृत्यू | पुढारी

नगर: उंबरे येथे सुटीवर आलेल्या जवानाचा अपघातात मृत्यू

उंबरे (नगर), पुढारी वृत्तसेवा: पिंप्री अवघड शिवारात दुचाकी व चारचाकी वाहनाच्या भीषण अपघातात उंबरे येथील सुपुत्र व सैन्यदलातील जवान योगेश बाळासाहेब पटारे यांचा मृत्यू झाला, तर युवा व्यावसायिक पवन राजेंद्र उंडे हे गंभीर जखमी झाले. उंडे यांच्यावर नगर येथे उपचार सुरू आहेत. या घटनेने उंबरे गावावर शोककळा पसरली आहे.

योगेश पटारे हे पठाणकोट येथे कर्तव्यावर होते. त्यांची हैदराबाद येथे बदली झाली. या दरम्यान आपल्या दीड महिन्याच्या मुलाला भेटण्यासाठी ते सुटीवर आले होते. दोन दिवसांनी सुटी संपताच ते हैदराबादला हजर होणार होते. दरम्यान, मंगळवारी सकाळी पटारे व त्यांचे मित्र पवन उंडे हे श्रीरामपूरला मित्राच्या विवाहासाठी गेल्याचे समजले. तेथून परतताना दुपारी तीनच्या सुमारास राहुरी-सोनई मार्गावर पिंप्री अवघड शिवारात टोलनाक्यालगत त्यांच्या दुचाकीला समोरून येणार्‍या चारचाकी वाहनाची धडक बसली. या अपघातात पटारे यांचा जागीच मृत्यू झाला, तर उंडे गंभीर जखमी झाले.

दरम्यान, अपघातानंतर संतप्त उंबरे ग्रामस्थ रस्त्यावर उतरले होते. या मार्गावर कोठेही गतिरोधक किंवा झेब्रा क्रॉसिंग नाही. त्यामुळेच अनेक निरपराधांचे बळी जात असून, याप्रकरणी ठेकेदार व प्रशासकीय अधिकार्‍यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी होत आहे.

Back to top button