सांगली : सोरडीमध्ये बनावट सोने तारण ठेऊन बँकेला २५ लाखांना फसवले | पुढारी

सांगली : सोरडीमध्ये बनावट सोने तारण ठेऊन बँकेला २५ लाखांना फसवले

जत (सांगली); पुढारी वृत्तसेवा : सोरडी (ता.जत ) येथील जिल्हा बँकेच्या शाखेत बनावट सोने देऊन शाखेला २५ लाख ७३ हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी सात कर्जदार व सराफ (व्हॅल्युशनर) अशा आठ जणांवर जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी जत पोलीस ठाण्यात जिल्हा बँकेचे जत मार्केट यार्ड शाखेतील तालुका विभागीय अधिकारी राजेंद्र नाटेकर यांनी फिर्याद दिली आहे. या घटनेने बँकिंग क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

बनावट सोने तारण ठेवून बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी शहाजी मारुती तुराई (रा. राजोबावाडी), अस्लम अमिन मुलाणी ,धनाजी भिमराव पुजारी , अंकुश सदाशिव मलमे तिघे (रा. दरीकोणुर ), धोंडाप्पा भिमराम गावडे, आशाबाई आप्पासाहेब टेंगले, माय्याका भिवा गावडे तिघे (रा. सोरडी )संजय विठ्ठल सावंत (रा. माडग्याळ )असे सराफ सह एकूण आठ जणावर जत पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

नाटेकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, दिनांक 26 ऑक्टोंबर 2022 ते 13. एप्रिल 2023 दरम्यान सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. शाखा सोरडी येथे सोने कर्ज खातेदार शहाजी मारुती तुराई, अस्लम अमिन मुलाणी, धोंडाप्पा भिमराम गावडे, आशाबाई आप्पासाहेब टेंगले, धनाजी भिमराव पुजारी, अंकुश सदाशिव मलमे, माय्याका भिवा गावडे यांनी व्हॅल्युशनर सावंत यांच्याशी संगनमत करून बँकेत बनावट १७ सोन्याचे जिनस ठेवून फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.

तसेच बँकेचा व्हॅल्युशनर सराफ संजय विठ्ठल सावंत (रा. माडग्याळ) याने ते सोने खरे असल्याचे मुल्यांकन (व्हॅल्युएशन) लेखी स्वरुपात बँकेच्या कर्जरोख्याच्या फॉरमॅटमध्ये स्वतः च्या सहीशिक्याने प्रमाणीत केले होते. सदरचे जिन्नस बँकेस तारण म्हणून बनावट सोने गहान देऊन त्या तारणावर एकूण कर्ज रक्कम २५ लाख ७३ हजार रुपये अशी रक्कम सात कर्जदार व व्हॅल्युशनर सराफ संजय विठ्ठल सावंत यांनी संगनमत करून घेवून सोरडी बँक शाखेची फसवणुक केली आहे. असे फिर्यादीत म्हटले आहे.

तीन महिन्यातील दुसरी घटना

जिल्हा बँकेत बनावट सोने कारण ठेवून खातेदारांना मदत केल्याप्रकरणी सुवर्णकार (व्हॅल्युशनर) यांच्यावर दुसरा गुन्हा दाखल झाला आहे. यापूर्वी ४ फेब्रुवारी २०२३ रोजी जिल्हा बँकेतील एका शाखेत १३ लाख ६१ हजारचे बनावट सोने तारण प्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल झाला होता. त्यातील एका व्हॅल्यूशनराचा पुन्हा समावेश या गुन्ह्यात झाल्याने खळबळ उडाली आहे. अजून काही अशा घटना घडल्या आहेत का? याची चौकशी करण्याची गरज आहे.

अधिक वाचा :

Back to top button