बृजभूषण यांच्यावर कारवाई का होत नाही? भाजपसाठी बनलेत अवघड जागेचं दुखणं | पुढारी

बृजभूषण यांच्यावर कारवाई का होत नाही? भाजपसाठी बनलेत अवघड जागेचं दुखणं

लखनौ, वृत्तसंस्था : महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी दिल्ली पोलिस महिला भाजपचे खासदार बृजभूषण सिंह (brijbhushan singh) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करणार आहेत. भारताचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात ही माहिती दिली. यानंतर भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. पण असे असूनही भाजपकडून उत्तर प्रदेशातील या बड्या नेत्यावर कारवाई का होत नाही? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

विनेश फोगट, बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक सारखे ऑलिम्पियन कुस्तीपटू बृजभूषण सिंह (brijbhushan singh) यांच्याविरोधात जंतर-मंतरवर गेल्या 6 दिवसांपासून आंदोलन करत आहेत. या कुस्तीपटूंनी कुस्ती महासंघाच्या अध्यक्षांविरोधात सुप्रीम कोर्टात याचिकाही दाखल केली आहे. ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल हे या कुस्तीपटूंचे वकील आहेत.

यावर्षी जानेवारीपासून हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. पत्रकार परिषद घेऊन कुस्तीपटूंनी बृजभूषण सिंह (brijbhushan singh) यांच्यावर थेट आरोपांच्या फैरी झाडल्या होत्या. त्यानंतर पैलवांनानी जंतर-मंतरवर धरणे आंदोलन केले. याची दखल घेत केंद्र सरकारने चौकशी समिती स्थापन करून कारवाईचे आश्वासन दिले. त्यानंतर कुस्तीपटूंनी आंदोलन माघारी घेतले, पण चौकशी समितीने ठरलेल्या कालावधीत आपला अहवाल सादर केला नाही. उशिरा सादर झालेल्या अहवालावर कुस्तीपटूंचे समाधान झाले नाही. यानंतर त्यांनी पुन्हा आंदोलनाचे शस्त्र हाती घेतले.

लैंगिक शोषणाचा आरोप होऊनही बृजभूषण शरण सिंह यांच्यावर भाजपकडून कारवाई का केली जात नाही? भाजपची अशी कोणती अडचण झाली आहे, ज्याने ते उत्तर प्रदेशच्या या दिग्गज नेत्याला दुखवू शकत नाहीत? बृजभूषण यांचा राजकीय दबदबा यासाठी कारणीभूत आहे का? असे अनेक प्रश्न या प्रकरणानंतर उपस्थित झाले आहेत, पण अशी काही कारणे समोर आली आहेत, ज्यामुळे भाजप बृजभूषण यांच्याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे.

1. लोकसभेच्या चार जागांवर प्रभाव

बृजभूषण सिंह कैसरगंज मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांनी तीन वेगवेगळ्या लोकसभा जागांवर विजय मिळवला आहे. गोंडा येथून ते 1991, 1998, 1999 मध्ये विजयी झाले होते. त्यानंतर 2004 मध्ये बलरामपूर (आता श्रावस्ती) येथून ते विजयी झाले. मात्र, 2008 मध्ये अणुकराराच्या वेळी ते भाजप सोडून सपामध्ये गेले आणि मनमोहन सिंग सरकार वाचवण्याची महत्त्वाची भूमिका बजावली. पक्ष बदलल्यानंतरही त्यांचा लोक समर्थनात कमी झाली नाही. 2009 मध्ये त्यांनी सपाच्या तिकिटावर कैसरगंज जागा चांगल्या मताधिक्याने जिंकली.

2013 मध्ये मुझफ्फरनगर दंगलीनंतर ते भाजपमध्ये परतले. त्यानंतर पुन्हा एकदा बृजभूषण यांनी आपले नेतृत्व सिद्ध केले आणि 2014, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत कैसरगंज मतदारसंघातून भाजपचे कमळ फुलवले. म्हणजेच श्रावस्ती, बहराइच, गोंडा आणि कैसरगंज या जागांवर बृजभूषण सिंह यांचा थेट प्रभाव आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपसाठी एक-एक जागा खूप महत्त्वाची ठरणार आहे. अशा स्थितीत ते बृजभूषण सिंह यांच्याविरोधात कोणतेही पाऊल उचलण्यास कचरत असल्याचे बोलले जात आहे.

2. सपाला टक्कर देण्याच्या तयारीत बृजभूषण आघाडीवर

2024 च्या निवडणुकीत ज्या जागांवर सपाचे वर्चस्व आहे त्या जागा जिंकण्यासाठी भाजपने तयारी केली आहे. यात मैनपुरी, रामपूर, आझमगड, रायबरेली या जागांचा समावेश आहे. अशा परिस्थितीत बृजभूषण यांच्यावर कठोर कारवाई झाल्यास किंवा ते पक्षाबाहेर गेले तर अवध भागातील अनेक जागांवर भाजप बॅकफुटवर जाऊ शकतो. अशा स्थितीत सपाला टक्कर देणे लांब या जागाही हाताबाहेर जाऊ शकतात.

3. कलंकित, पण दोषी नाही

बृजभूषण हे राम मंदिर आंदोलनाशी जोडले गेले आहेत. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, कल्याण सिंह आणि उमा भारती यांच्यासह बाबरी विध्वंस प्रकरणातील 40 आरोपींमध्ये त्यांचा समावेश होता. या प्रकरणात सीबीआय न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली. सध्या बृजभूषण कलंकित झाले असले तरी त्यांच्यावरचे दोष अद्याप सिद्ध झालेले नाहीत.

4. राम मंदिर आंदोलनात सामील

बृजभूषण हे राम मंदिर आंदोलनादरम्यान लालकृष्ण अडवाणी यांच्या रथयात्रेत सक्रिय होते. 1991 मध्ये त्यांनी पहिल्यांदा लोकसभा निवडणूक लढवली तेव्हा त्यांच्यावर 34 गुन्हे दाखल झाले होते. त्यावेळी भाजपने बृजभूषण हे ‘गोंडाचे रॉबिनहूड’ अशी घोषणा देत जोरदार प्रचार केला.

5. गुन्हे दाखल असलेल्या खासदारांचे काय होणार?

भाजपने बृजभूषण यांच्यावर कारवाई केली तर त्यांच्यावर राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाबाबत प्रश्न उपस्थित केले जातील. अशा परिस्थितीत जे खासदार कलंकित आहेत आणि ज्यांच्या विरोधात छोट्या-मोठ्या न्यायालयात खटले सुरू आहेत, त्यांच्यावरही विरोधक आक्रमक होतील. एडीआरच्या अहवालानुसार, 2019 च्या लोकसभेत विजय मिळवणार्‍या 233 खासदारांवर गुन्हेगारी प्रकरणे आहेत.

Back to top button