सांगली: खरसुंडी येथे अतिक्रमण हटवण्यासाठी तरुणाचे बेमुदत उपोषण | पुढारी

सांगली: खरसुंडी येथे अतिक्रमण हटवण्यासाठी तरुणाचे बेमुदत उपोषण

आटपाडी; पुढारी वृत्तसेवा: खरसुंडी येथील श्री सिध्दनाथ देवस्थानासमोरील अतिक्रमणे हटवावीत, या मागणीसाठी शेखर सोमनाथ निचळ या तरुणाने शनिवारपासून (दि.८)  ग्रामपंचायतीसमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. खरसुंडी सिध्दनाथ यात्रेच्या तोंडावर सुरू झालेले हे उपोषण अद्याप प्रशासनाने गांभीर्याने घेतलेले दिसत नाही. दरम्यान, गटविकास अधिकारी मनोज भोसले वगळता कोणी अंदोलनाकडे फिरकलेले नाही.

खरसुंडी येथील सिध्दनाथाच्या प्राचीन मंदिरासमोर अनेक अतिक्रमणे आहेत. मुख्य प्रवेशव्दार आणि मुख्य पेठेतील अतिक्रमणांमुळे ग्रामस्थांना आणि लाखो भक्तांना या अतिक्रमणाचा मोठा त्रास होत आहे. याबाबत शेखर निचळ यांनी नोव्हेंबर महिन्यात आंदोलन केले होते. त्यानंतर काही अतिक्रमणे निघाली. परंतु अन्य अतिक्रमणे कायम आहेत.

देवस्थानच्या मुख्य प्रवेशद्वारावर आणि रस्त्याच्या दुतर्फा असलेली अतिक्रमणे हटवावीत. स्वातंत्र्यपूर्व काळात औंध संस्थानच्या कालखंडातील नकाशानुसार सर्व पूर्ववत करावे. मंदिरातील दीपमाळा दिसव्यात आणि मुख्य पेठ १९८५ सालच्या सिटी सर्व्हे पूर्वी औंध संस्थान कालखंडात जशी होती. त्याप्रमाणेच ती खुली करून पक्की अतिक्रमणे काढावीत, अशी निचळ यांची मागणी आहे.

शेखर निचळ यांनी नोव्हेंबर २०२२ मध्ये केलेल्या उपोषणानंतर चार अतिक्रमणे निघाली. परंतु उर्वरित अतिक्रमणे अद्याप निघालेली नाहीत. आता सर्व अतिक्रमणे निघाल्याशिवाय उपोषण मागे न हटण्याचा निर्धार करत निचळ यांनी रविवारी सलग दुसऱ्या दिवशी आंदोलन सुरू ठेवले आहे.

निचळ यांच्या आंदोलनाला ग्रामस्थांचा पाठींबा वाढत चालला आहे. १७ एप्रिलला खरसुंडी यात्रेचा मुख्य दिवस आहे. सासनकाठी सोहळ्यानिमित्त लाखो भाविक येतात. त्यापूर्वी अतिक्रमणे हटविली जाणार का? पुन्हा एकदा आश्वासनाचे गाजर दाखवून वेळ मारून नेली जाणार ? याकडे सर्व ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

खरसुंडी येथे सिटी सर्व्हेआधी हुजरी रेकॉर्ड होते. औंध संस्थानच्या काबुलियत प्रतीप्रमाने जागेचे मोजमाप करावे. औंध संस्थानच्या अधिकृत दस्ताऐवजानुसार सध्याची अतिक्रमणे स्पष्ट होतील.

– राहुल गुरव

हेही वाचा 

Back to top button