सांगली : वडिलांना अग्नी देऊन गेलेल्या जवानाचा अपघातात मृत्यू | पुढारी

सांगली : वडिलांना अग्नी देऊन गेलेल्या जवानाचा अपघातात मृत्यू

कोरेगाव/पळशी; पुढारी वृत्तसेवा :  कोरेगाव तालुक्यातील भाडळे खोर्‍यात असणार्‍या नागेवाडी (भाडळे) गावातील अंकुश संपतराव मारकर (वय 39) हे वडिलांना अग्नी देवून सैन्यदलात रूजू झाले होते. मात्र, त्यानंतर पंधरा दिवसांतच अंकुश मारकर यांचा दि. 5 एप्रिल रोजी राजस्थान येथे मृत्यू झाला. सेवानिवृत्तीसाठी 4 महिने शिल्लक असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. दरम्यान, रेल्वे अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती नातेवाईकांकडून देण्यात आली.

अंकुश मारकर हे जम्मू काश्मीर येथे बॉम्बे इंजिनिअर युनिट नंबर 106 मध्ये कार्यरत होते. पंधरा दिवसांपूर्वी त्यांचे वडील संपतराव मारकर यांचे निधन झाले होते. त्यांना अग्नी देण्यासाठी अंकुश हे गावी आले होते. अंत्यविधी उरकल्यानंतर ते पुन्हा नोकरीच्या ठिकाणी रूजू झाले होते. मात्र, रेल्वेमधून पडल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. वडिलांनंतर काही दिवसांतच अंकुश यांनाही वीरमरण आले. अंकुश यांनी 19 वर्षांच्या सेवा कालावधीमध्ये पुणे, सिक्कीम, कालूचक, लेह, लडाख, चंदीगढ, राजुरी, श्रीनगर या ठिकाणी सेवा बजावली आहे.

अवघ्या 4 महिन्यांनंतर ते सेवानिवृत्त होणार होते. मात्र, त्यापूर्वीच त्यांच्यावर काळाने घाला घातला. काही दिवसांच्या अंतरातच वडील व मुलाचा मृत्यू झाल्याने मारकर कुटुंबासह नागेवाडी परिसरावर शोककळा पसरली आहे. दरम्यान, अंकुश मारकर यांचे रविवारी सायंकाळी पार्थिव येणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. अंकुश यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, दोन भाऊ असा परिवार आहे.

Back to top button