सांगली : बफरझोन धाब्यावर बसवून नाल्यालगत बांधकाम! | पुढारी

सांगली : बफरझोन धाब्यावर बसवून नाल्यालगत बांधकाम!

सांगली; पुढारी वृत्तसेवा :  येथे बायपास रोडजवळ नाल्यालगत शेडचे बांधकाम सुरू आहे. बफरझोनमध्ये बांधकाम सुरू असल्याचे निदर्शनास येताच एका नगरसेवकांनी महापालिकेच्या स्वच्छता निरीक्षकाकडे तक्रार केली आहे. या बांधकामाच्या चौकशीची मागणी केली आहे.

नगरविकास विभागाच्या युडीसीपीआर (एकत्रित विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली) मधील तरतुदीनुसार नाल्यालगत 6 ते 9 मीटर बफरझोन असतो. या बफरझोनमध्ये कोणत्याही प्रकारचे बांधकाम करता येत नाही. महानगरपालिकेच्या नगररचना विभागाकडून बांधकामास परवानगी दिली जात नाही. मात्र बायपासरोड जवळ आयुक्त बंगल्याच्या उत्तरेकडील बाजूच्या नाल्यालगत एका शेडचे बांधकाम सुरू आहे. हे बांधकाम अगदी नाल्याला खेटून सुरू आहे. त्यामुळे बफरझोनमध्ये बांधकाम न करण्याच्या तरतुदीचे उल्लंघन होत आहे. याप्रकरणी चौकशीची मागणी एका नगरसेवकांनी केली आहे.

एका नगरसेवकांनी या वादग्रस्त बांधकामासंदर्भात महापालिकेच्या संबंधित भागातील स्वच्छता निरीक्षकाकडे तक्रार केली. महापालिकेच्या नगररचना विभागाची परवानगी घेऊन हे बांधकाम सुरू आहे का, असाही प्रश्न विचारला. संबंधित स्वच्छता निरीक्षकाने याकडे नगररचना विभागाचे तसेच अतिक्रमण विभागाचे लक्ष वेधणे आवश्यक आहे. मात्र ती कार्यवाही झाली का, याबाबत साशंकता असल्याचेही संबंधित नगरसेवकांनी सांगितले.

स्वच्छता निरीक्षकाची डोळेझाक?

भागात अनधिकृत अथवा बेकायदा बांधकाम सुरू असल्यास संबंधित स्वच्छता निरीक्षकांनी नगररचना विभागाला तातडीने कळवायचे आहे. नगरसेवकांनी तक्रार करेपर्यंत डोळेझाक कशासाठी, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. आयुक्त सुनील पवार यांनी या प्रकाराची गंभीर दखल घ्यावी. नाल्यावर अतिक्रमण करून अथवा नाल्याच्या बफरझोनमध्ये शेडचे बांधकाम सुरू असेल तर ते तत्काळ पाडावे, अशी मागणीही संबंधित नगरसेविकांनी केली आहे.

Back to top button