कसबे डिग्रज; मौला कौठावळे : मिरज तालुक्यातील तुंग येथे भूमी ग्रीन पॉवर प्रोजेक्टमध्ये येणारे प्लास्टिक कचर्याचे ट्रक शेतकर्यांनी अडविलेे. कचरा जाळणे बंद होत नाहीत, तोपर्यंत ट्रक सोडणार नाही, अशी आक्रमक भूमिका ग्रामस्थांनी घेतली.
या प्रकल्पामध्ये पुणे महापालिकेचा प्लास्टिकयुक्त कचरा आणला जातो. हा कचरा जाळून वीज निर्मिती केली जाते. यामुळे परिसरातील शेती धोक्यात आली आहे. याबाबत तुंग सुधार समिती, ग्रामपंचायतीने गटविकास विकास अधिकारी, जिल्हा प्रदूषण नियंत्रण विभाग, कृषी विभाग, तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडे वारंवार तक्रार देऊन देखील कारवाई झालेली नाही. त्यामुळे आज संतप्त शेतकर्यांनी प्लास्टिकयुक्त कचर्याचे ट्रक अडवून आंदोलन केलेे. जोपर्यंत भूमी ग्रीन पॉवर प्रोजेक्टमध्ये प्लास्टिकयुक्त कचरा जाळण्याचे बंद होत नाही, तोपर्यंत ट्रक सोडणार नाही. आमच्यावर गुन्हा दाखल झाला तर बेहत्तर, अशीच भूमिका शेतकर्यांनी घेतली आहे.
या प्रकल्पामुळे पिकांचे मोठे नुकसान होत आहे. नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. वीज निर्मिती करून पाणी नाल्यात सोडले जाते. यामुळे जनावरे दगावली आहेत. गेली अनेक वर्षे तक्रार करूनही प्रशासन दखल घेत नाही. पाहणीच्या नावाखाली वेळकाढूपणा सुरू आहे. ठोस कारवाई नाही, दोन महिन्यांपासून केवळ कागदी घोडे नाचविले जात आहेत, त्यामुळे आता आंदोलनाशिवाय पर्याय नाही, असे आंदोलनातील सहभागी शेतकर्यांनी सांगितले.