सांगली : सात बाजार समित्यांच्या निवडणुकीचा धुरळा | पुढारी

सांगली : सात बाजार समित्यांच्या निवडणुकीचा धुरळा

सांगली; पुढारी वृत्तसेवा :  सांगलीसह जिल्ह्यातील सात कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीचा धुरळा सुरु झाला आहे. बहुतांश ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप अशी सर्वपक्षीय पॅनेल होण्याची शक्यता आहे. इच्छुकांची संख्या जादा असल्याने सर्वच लढती चुरशीच्या होण्याची चिन्हे आहेत.

सांगली, तासगाव, पलूस, विटा, इस्लामपूर, शिराळा आणि आटपाडी या सात बाजार समित्यांच्या निवडणूक होत आहे. दि. 27 मार्च ते दि. 3 एप्रिल या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. छाननी दि. 5 रोजी आहे. पात्र उमेदवारांची नावे दि. 6 एप्रिलला प्रसिद्ध होतील. त्यानंतर दि. 6 ते 20 अर्ज माघारीची मुदत आहे. दि. 21 एप्रिलला उमेदवारांची अंतिम यादी प्रसिध्द होणार आहे. दि. 30 एप्रिलला मतदान होईल. मतदान संपल्यानंतर त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. या सात बाजार समित्यांसाठी 24 हजार 528 मतदार आहेत. त्यामध्ये सांगली बाजार समितीचे मिरज, कवठेमहांकाळ आणि जत या तीन तालुक्यात 8 हजार 675 मतदार आहेत. शिराळ्यात 2 हजार 886 मतदार, आटपाडीत 1 हजार 992, विट्यात 3 हजार 159, पलूसमध्ये 1 हजार 158, इस्लामपूरमध्ये 4 हजार 739 तर तासगाव बाजार समितीचे 1 हजार 949 मतदार आहेत.

सांगली बाजार समिती राजकीयद़ृष्ट्या महत्वाची आहे. या समितीचे मिरज, कवठेमहांकाळ आणि जत या तीन तालुक्यात कार्यक्षेत्र आहे. याठिकाणी सत्तेत येण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष प्रयत्नशील असतात. तर संचालक होण्यासाठी अनेकजण प्रयत्नशील असतात. निवडणूक लांबल्याने आता तर इच्छुकांची संख्या मोठी आहे.

Back to top button