सांगली : नागराळेत युवकावर चाकूने प्राणघातक हल्ला, युवक गंभीर; पाच जणांना अटक | पुढारी

सांगली : नागराळेत युवकावर चाकूने प्राणघातक हल्ला, युवक गंभीर; पाच जणांना अटक

पलूस (सांगली); पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील नागराळे येथे वाहन आडवे मारलेच्या कारणावरून सुरु असलेले भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या रणवीर झुंजारराव गायकवाड (वय ४१ वर्षे) या युवकावर चाकूने प्राणघातक हल्ला करित गंभीर जखमी केले. याबाबत माणिक सर्जेराव पाटील, आकाश संपत पाटील, किरण बाजीराव पाटील, बाजीराव बाळासाहेब पाटील, संपत बाळासाहेब पाटील (सर्व रा. नागराळे, ता. पलूस) या पाच आरोपीना अटक केली आहे. या पाच आरोपी विरोधात रणवीर झुंजारराव गायकवाड यांनी पलूस पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी (दि.२९) रोजी सायंकाळी साडे सहाच्या सुमारास नागराळे गावच्या कमानीजवळील रस्त्यालगत सचिन वसंत पाटील व आकाश वसंत पाटील यांच्यात वाहनाला कट का मारला या कारणावरून भांडण सुरू होते. ते भांडण सोडविण्यासाठी रणवीर गायकवाड मध्ये पडला. फिर्यादी मध्ये का पडला याचा राग मनात धरून जीवे मारण्याच्या उद्देशाने आरोपी नं १. माणिक पाटील याने फिर्यादीच्या पोटात चाकुने दोन ते तीन वेळा सपासप वार करित गंभीर जखमी केले.

यावेळी आकाश पाटील, किरण पाटील, बाजीराव पाटील, संपत पाटील यांनी सुद्धा फिर्यादीस लाथाबुक्यांनी मारहाण करून शिवीगाळ करत तुला जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी देवून पळून गेले. जखमी गायकवाड यांना उपचारासाठी तातडीने ग्रामस्थांनी सांगली येथील मेहता हॉस्पीटल मध्ये दाखल केले. त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली असून त्याची तब्बेत अजून गंभीर असल्याचे समजते. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांनी तातडीने पथक तयार करून आरोपीना नागराळे येथून अटक केली. ३१ मार्च रोजी त्यांना पलूस न्यायालयात हजर केले जाणार आहे. अधिक तपास पलूस पोलीस करित आहेत.

अधिक वाचा :

Back to top button