Nana Patole : पक्ष विरोधी भूमिका घेणाऱ्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर काँग्रेस करणार कारवाई : नाना पटोले | पुढारी

Nana Patole : पक्ष विरोधी भूमिका घेणाऱ्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर काँग्रेस करणार कारवाई : नाना पटोले

चंद्रपूर (पुढारी वृत्तसेवा) : पक्षविरोधी भूमीका घेणाऱ्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर कॉँग्रेस पक्ष कारवाई करणार आहे. पक्षाचे होणारे नुकसान टाळण्यासाठी पक्षाकडून वेळीच कारवाई करण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ही बाब अतिशय गांभीर्याने घेऊन जिल्हास्तरीय शिस्तभंग समिती गठित करण्याबाबत निर्देश दिले आहेत. Nana Patole

स्थानिक नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते अनेक वेळा वरिष्ठ नेत्यांच्या व पक्षाच्या विरोधात वक्तव्य करत असतात, स्थानिक पातळीवरील निवडणुकांमध्ये पक्षविरोधी भूमिका घेतात. तसेच बॅनर, पोस्टर इत्यादींबाबतही राजशिष्ठाचार पाळले जात नसल्याची अनेक प्रकरणे प्रदेश काँग्रेस कार्यालयास प्राप्त झाली आहेत. या सर्व बाबी अतिशय गंभीर स्वरूपाच्या आहेत. पक्षविरोधी भूमीका घेणाऱ्या कार्यकर्त्यांवर वेळीच योग्य ती कारवाई न झाल्यास पक्षाचे फार मोठे नुकसान होऊ शकते. ही शक्यता लक्षात घेता नाना पटोले यांनी ही बाब अतिशय गांभीर्याने घेऊन जिल्हास्तरीय शिस्तभंग समिती गठित करण्याबाबत निर्देश दिले आहेत. Nana Patole

जिल्हास्तरीय शिस्तभंग समिती मध्ये जिल्हा प्रभारी तथा जिल्हा सहप्रभारी मानद सदस्य राहतील तर जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष पदसिध्द अध्यक्ष असतील. विद्यमान खासदार किंवा लोकसभा निवडणूक २०१९ मधील पक्षाचा उमेदवार, विद्यमान आमदार किंवा विधानसभा निवडणूक २०१९ मधील पक्षाचा उमेदवार (संबधित विधानसभा क्षेत्रा करीता) समितीचा सदस्य राहील.  जिल्हा परिषद अध्यक्ष / उपाध्यक्ष / गटनेता, महानगरपालिका महापौर / उपमहापौर / विरोधी पक्षनेता / गटनेता यांचाही या समितीत सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. Nana Patole

जिल्हास्तरीय शिस्तभंग समितीने आपल्या जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी पक्षीय कामकाज व पक्षवाढी विरोधात कोणतेही गैरवर्तन केल्यास त्यांना शिस्तभंग समितीच्या अध्यक्षाने रितसर नोटीस देऊन ७ दिवसांच्या आत खुलासा मागवावा. खुलासा समाधानकारक नसल्यास समितीची तातडीने बैठक बोलावून सदर व्यक्तीच्या गैरवर्तनासंदर्भात शिस्तभंग कारवाई बाबतचा प्रस्ताव अंतिम निर्णयासाठी प्रदेश कार्यालयास पाठवावा असेही निर्देश दिले आहेत. काँग्रेसचे राज्यातील सर्व जिल्हा अध्यक्ष, जिल्हा काँग्रेस समिती शहर / ग्रामीण यांना प्रदेश काँग्रेस समितीचे संघटन व प्रशासन विभागाचे सरचिटणीस देवानंद पवार यांनी लेखी पत्र पाठवून ही शिस्तभंग समिती तत्काळ गठीत करण्यास सांगितले आहे. Nana Patole

हे वचलंत का? 

Back to top button