सांगली : विहिरीत तोल जावून तरुणाचा मृत्यू; कोसारी येथील घटना | पुढारी

सांगली : विहिरीत तोल जावून तरुणाचा मृत्यू; कोसारी येथील घटना

जत; पुढारी वृत्तसेवा : कोसारी (ता. जत) येथे विद्युत पंप चालू करायला गेलेल्या एका तरुणाचा विहिरीत तोल गेल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. रामचंद्र आनंदा वाघमोडे (वय.२१) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (दि.२३) रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेची नोंद जत पोलिसात झाली आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, रामचंद्र वाघमोडे याच्या घरापासून अर्धा किलोमीटर अंतरावर शेतात विहीर आहे. गुरूवारी सकाळी दहा वाजता रामचंद्र हा मोटर ( विद्युत पंप ) चालू करण्यासाठी विहिरीवर गेला होता. परंतु, दोन तासाहून अधिक वेळ झाला तरी तो घराकडे परतला नाही. म्हणून रामचंद्रचे वडील आनंदा वाघमोडे हे विहिरीवर गेले असता विहिरीच्या काठावर चप्पल पडलेली दिसून आली.

यानंतर विहिरीत शोधाशोध करून मृतदेह बाहेर काढण्यात आला. रामचंद्र यास पोहता येत होते. परंतु, तोल जावून अचानक डोक्याला मार लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. जत येथील ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यासाठी दाखल केले आहे. रुग्णालयाच्या परिसरात नातेवाईकांनी गर्दी केली होती. या घटनेची नोंद जत पोलिसात झाली आहे.

हेही वाचा : 

Back to top button