Kolhapur : 'राजाराम' निवडणुकीसाठी चौथ्या दिवशी एका विद्यमान संचालकासह ३१ उमेदवारी अर्ज दाखल | पुढारी

Kolhapur : 'राजाराम' निवडणुकीसाठी चौथ्या दिवशी एका विद्यमान संचालकासह ३१ उमेदवारी अर्ज दाखल

कसबा बावडा; पुढारी वृत्तसेवा: श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२३ ते २०२८ या पंचवार्षिक निवडणुकीसाठी चौथ्या दिवशी विद्यमान संचालक प्रशांत तेलवेकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख व माजी जि. प. सदस्य बाजीराव पाटील यांच्यासह ३१ उमेदवारी अर्ज दाखल झाले. तर गुरुवारी दिवसभरात ३० अर्जांची विक्री झाली आहे. (Kolhapur)

बुधवारी (दि.२२) गुढी पाडव्याची सुट्टी होती.  गुरुवारी सकाळी पासुन निवडणूक अधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांनी हजेरी लावली. कारखान्याचे चेअरमन दिलीपराव पाटील यांनी आज दुबार अर्ज दाखल केला. गटनिहाय अर्ज दाखल करण्यासाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली होती. निवडणुकीसाठी सुरू असलेली चुरस पाहता निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय परिसरात चोख पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.

चार दिवसात एकुण २९८ अर्जांची विक्री

कारखान्याच्या निवडणुकीसाठी सोमवारी (दि.२०) पहिल्याच दिवशी तब्बल २१६ अर्जांची विक्री झाली होती, तर १७ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. मंगळवारी (दि.२१) ५२ अर्जांची विक्री झाली आणि दिवसभरात केवळ एक अर्ज दाखल झाला होता. गुरुवारी (दि.२२) ३० अर्जांची विक्री झाली तर ३१ उमेदवारी अर्ज दाखल झाले. चार दिवसात एकुण २९८ अर्जांची विक्री होऊन ४९ उमेदवारी अर्ज दाखल आहेत.

गटनिहाय उमेदवारी अर्ज दाखल झालेली संख्या अशी. ऊस उत्पादक गट क्र. १ : २, गट क्र. २ : २, गट क्र. ३ : ७, गट क्र. ४ : ५, गट क्र. ५ : २, गट क्र. ६ : ३, अनुसूचित जाती जमाती सदस्य : ४, महिला प्रतिनिधी सदस्य : ४, इतर मागासवर्ग सदस्य : २. आहे.

हेही वाचा 

Back to top button