पुणे: भाजपच्या सरचिटणीसाला शिवीगाळ करून धमकावले; राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकावर गुन्हा | पुढारी

पुणे: भाजपच्या सरचिटणीसाला शिवीगाळ करून धमकावले; राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकावर गुन्हा

पुणे, पुढारी वृत्तसेवा: भारतीय जनता पक्षाच्या सरचिटणीसांना शिवीगाळ करून धमकावल्यानंतर, कामगारांना मारहाण केल्याच्या आरोपावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक सचिन दोडके यांच्यासह पाच ते सहा जणांच्या विरुद्ध वारजे पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत भाजपाचे सरचिटणीस वासुदेव शिवाजी भोसले (वय 45, रा. राजयोग सोसायटी, वारजे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक सचिन दोडके, संजय दोडके यांच्यासह पाच ते सहा कार्यकर्त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 21 मार्च रोजी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपचे आमदार भीमराव तापकीर यांच्या विकास निधीतून वारजे भागातील आरएमडी महाविद्यालयाजवळ भुयारी मार्ग परिसरात रंगकाम करण्यात येत होते. त्या वेळी सचिन दोडके आणि कार्यकर्ते तेथे आले. त्यांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. कोण येथे काम करतो. त्याचे हातपाय तोडतो. वारज्यात कसा राहतो ते पाहतो, असे सांगून दोडके आणि कार्यकर्त्यांनी भोसले यांना धमकावले. रंगकाम करणार्‍या कामगारांना शिवीगाळ करुन कार्यकर्त्यांनी मारहाण केली. कार्यकर्त्यांनी रंगाचे डबे फेकून दिले, असे भोसले यांनी फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक मुंढे तपास करत आहेत.

Back to top button